कवलेवाडा, मुंडीपार साज्यात कायमस्वरूपी तलाठी व कोतवालाची नियुक्ती करा

0
20
निवेदन देताना जिप सदस्य किरणकुमार पारधी व उपस्थित शेतकरी

| जिप सदस्य किरण पारधी यांचे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन

तिरोडा : तालुक्यातील ग्राम कवलेवाडा साजा क्रमांक 16 व ग्राम मुंडीपार साजा क्रमांक 17 मध्ये कायमस्वरूपी तलाठी व कोतवाल नाहीत. त्यामुळे गावकरी तथा शेतकर्‍यांना सातबारा, नमुना 8, फेरफार तसेच तलाठ्याशी संबंधित कामे करण्यास मोठी अडचण होत आहे. शेतकर्‍यांची अनेक कामे रखडलेली आहेत. त्यामुळे सदर साज्यांमध्ये तात्काळ नवीन तलाठी व कोतवालाची नियुक्ती करण्यात यावी, अश्या मागणीचे निवेदन शेतकर्‍यांनी जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकार्‍यांना दिले आहे.

निवेदनानुसार, साजा क्रमांक 16 मध्ये तलाठी नाही. तर साजा क्रमांक 17 मध्ये बेलाटी बु., मुंडीपार, मांडवी ही तीन गावे येतात. परंतु कोतवाल नसल्यामुळे या गावातील शेतकर्‍यांना दाखले किंवा सातबारा घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे साजा क्रमांक 16 मध्ये नवीन तलाठी व साजा क्रमांक 17 मध्ये तलाठी व कोतवालाची नियुक्ती करण्यात यावी. त्यामुळे गावकरी तथा शेतकर्‍यांना दाखले घेणे सोयीचे होईल.

सदर निवेदन प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा नायब तहसीलदार रंगारी यांनी स्वीकारले. निवेदन देतेवेळी जिप सदस्य किरणकुमार पारधी यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य पिंटू चौधरी, कवलेवाडाचे सरपंच टानेश्वर रहांगडाले, ग्रामपंचायत सदस्य जितेश बोदेले, ठाणेगावचे ग्रामपंचायत सदस्य कैलाश पटले, मुंडीपारचे बालू चौधरी, मुंडीपारचे सरपंच वासुदेव हरिणखेडे, मांडवीचे तुरेन नागपुरे, चांदोरीचे वामन हारोडे, भोंबोडीचे रोशन गराडे, मुंडीपारचे मुन्नीलाल चौधरी, कैलाश चौधरी, लोधिटोलाचे राधेश्याम नागपुरे आदि उपस्थित होते.