पुर्व विदर्भात दुस-या दिवशीही सराफा बाजार बंद

0
8

नागपूर/गोंदिया/गडचिरोली-दि.3 : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या व्यवसायावर १ टक्का अबकारी कर लागू करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाच्या विरोधात सराफा व्यावसायिकांनी तीन दिवसांचा देशव्यापी बंद पुकारला असून, राज्याची उपराजधानी नागपूरसह गोंदिया,गडचिरोली  व चंद्रपूर जिल्हयातही त्याचे पडसाद उमटले आहेत. जिल्हयातील सराफा व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवल्याने  कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.

सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सोना चांदी ओळ कमिटीने तीन दिवसीय सराफा बाजार ‘बंद’ची घोषणा केली होती. आज दुसरा दिवस असून परिस्थितीत काहीच बदल न झाल्याने सोना चांदीचे दुकान आज देखील बंद ठेवण्यात आले आहेत. नागपूर सराफा असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सोपवले आहे.ज्यावर नितीन गडकरी यांनी अरुण जेटली यांच्याशी या विषयावर बोलण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती कमिटीने दिली. नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रकाश मेहाडीया हे नागपूर सराफा असोसिएशनच्या सभेला उपस्थित होते आणि त्यांनी नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने या बंदला पूर्ण पाठींबा दर्शविला आहे. 

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी(२९) संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या व्यवसायावर १ टक्का अबकारी कर(एक्साईज ड्युटी)लागू करण्याची घोषणा केली. यामुळे देशभरातील सराफा व्यावसायिकांमध्ये असंतोष पसरला असून, सरकारच्या या निर्णयामुळे सराफा व्यावसायिकांच्या व्यवसायावर विपरित परिणाम होईल. शिवाय अबकारी विभागाचे अधिकारी त्रास देणे सुरु करतील. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचा आम्ही विरोध करीत असल्याचे गडचिरोली सराफा असोसिएशनचे म्हणने आहे.