माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाचा पूर्व विदर्भात सिंचन कार्यक्रम

0
7

नागपूर : पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी (मा.मा.) तलावांचे पुनरुज्जीवन करणे, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे यावर प्रशासनाचा विशेष भर आहे. त्यासोबतच या तलावांमधील गाळ काढून या भागातील सिंचनक्षेत्र वाढविणे आणि मत्स्यसंवर्धनाला चालना देण्यात येणार आहे. यासाठी सन 2016-17 या वर्षासाठी एकूण 1414 मा.मा. तलावांच्या पुर्नस्थापनेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 207. 02 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. तसे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 पर्यंत राज्याला टंचाईमुक्त करण्याचा संकल्प केला असून, जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे यासारखे मोठे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये ही मोहिम राब‍विण्यात येत असल्याचे अनूप कुमार यांनी सांगितले.

मालगुजारी तलावांपासून सद्यस्थितीत खरीप हंगामात धानाच्या पिकास संरक्षित सिंचनाचा लाभ कमी मिळतो. तलावांच्या नुतनीकरणामुळे संपूर्ण सिंचन क्षमता स्थापित होऊन पीक उत्पादनात वाढ होईल. मत्स्यबीज संगोपन तळ्यात शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्यजीऱ्यांचे संगोपन होऊन मत्स्यबीजांमध्ये वाढ होईल. परिणामी पूर्व विदर्भात मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तलावांच्या क्षेत्रात लोकसहभाग वाढविण्यासाठी “निस्तार हक्क पाणी वापर संस्था” स्थापन करुन ती व्यवस्थापनासाठी संस्थाकडे सोपविण्यात येणार आहेत. त्यामुळे पीकांच्या उत्पादनात वाढ होऊन रोजगारांच्या संधी वाढतील व शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्व विदर्भातील यावर्षी पुनरुज्जीवनासाठी चंद्रपूर जिल्हा 473, गडचिरोली 209, गोंदिया 417, भंडारा 278 आणि नागपूर 37 आणि विभागातील एकूण 6489 माजी मालगुजारी तलावांपैकी 1414 तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

ॲङ मधुकरराव किंमतकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने स्थापना पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचा अभ्यास करुन 2012 मध्ये त्याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालानुसार सद्यस्थितीत जिल्हा परिषदेकडे व्यवस्थापनाकरिता असलेले मा.मा. तलाव बहुतेक जीर्ण अवस्थेत आहेत. त्यांचे सर्वकष नुतनीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत पुढील तीन वर्षाच्या सर्व उपायुक्त मा.मा. तलावांचे पुनर्स्थापन करण्याच्या नियोजनापैकी यावर्षीचे नियोजन करुन प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यासाठी संबंधित यंत्रणांचा परिणामकारक समन्वय साधून व संनियंत्रित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “जिल्हास्तरीय माजी मालगुजारी तलाव पुनरुज्जीवन समिती” गठीत करण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी अपर आयुक्त हेमंत पवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे हे उपस्थित होते.