कृषी विभागाचे संगनमत : गतिमान पाणलोट अंतर्गत बांधकामात अनियमितता

0
13

आमगाव : कृषी विभागांतर्गत तालुक्यात गतिमान पाणलोट कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेले बंधारे निकृष्ट दर्जाचे आहेत. या बांधकामात मोठय़ा प्रमाणात अनियमितता असल्याने त्वरित चौकशी करून कृषी विभागाच्या दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जि.प. सदस्य जियालाल पंधरे यांनी केली आहे.
कृषी अधिकारी आमगाव अंतर्गत येरमडा गावातजवळ यावर्षी दोन बंधारे तयार करण्यात आले. एक बंधारा नऊ लाख ६२ हजार तर दुसरा बंधारा नऊ लाख ७२ हजार रूपयांच्या खर्चातून तयार करण्यात आला. मात्र सर्व बंधार्‍यांची व्यवस्था जिल्हा कृषी अधीक्षकांकडे आहे. फक्त तालुक्यातील कृषी विभागाचा पर्यवेक्षक व्ही.पी. सहदेवकर यांची या बंधार्‍यावर देखरेख होती.
परिसरात कोरडवाहू शेतीला पाणी मिळावे व त्या पाण्याची साठवणूक होऊन शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळावा, हा मूळ हेतू या गतीमान पाणलोट कार्यक्रमांतर्गत तयार होणार्‍या बंधार्‍यामागे आहे. मात्र येरमडा येथील दोन्ही बंधार्‍याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. ज्या शेतकर्‍यांच्या शेताजवळ बंधारा तयार करण्यात आला, तेथील शेतजमिनीत उभ्या असलेल्या झाडांची नासधूस झाली. शेतात खोदकाम करण्यात आले. मात्र शेतकर्‍यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई त्यांना मिळाली नाही. अन्यायग्रस्त शेतकरी पतराम शरणागत यांनी आपल्या शेतीच्या झालेल्या नुकसानाच्या भरपाईची मागणी केली.