कौशल्य विकासामुळे देशाचा आर्थिक कणा मजबूत होईल – बावनकुळे

0
19

नागपूर : युवकांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करुन आत्मनिर्भर बनावे व कौशल्य विकासासाठी जगातील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन नवीन संसाधनाचा सुयोग्य वापर करावा. तसेच आपल्यातील कौशल्य जगासमोर सिद्ध करुन दाखविण्याची जबाबदारी प्रत्येक युवकाची आहे, युवकांमध्ये कौशल्य विकासामुळे देशाचा व राज्याचा आर्थिक कणा मजबूत होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रद्धानंद पेठ नागपूरच्यावतीने दोन दिवसीय सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन 2016 चे उद्घाटन आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक सतीश सूर्यवंशी, सहाय्यक संचालक सुरेश कुकडे, प्राचार्य प्रदीप लोणारे, महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा लिमिटेडचे जनरल मॅनेजर प्रदीप झोटिंग, उप प्राचार्य कृष्णकुमार लांजेवार आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 114 तंत्र कलाकृतींचे प्रदर्शन मांडण्यात आले.