नक्षलग्रस्त दुर्गम फुक्कीमेटा भागात रात्रीची ग्रामसभा

0
4

गोंदिया : जिल्ह्यात पाऊस प्रचंड पडतो.माती चांगली आहे. पाण्याचा साठा भरपूर आहे. वनसंपत्ती आपण जपून ठेवली आहे.या वनसंपत्तीचे जतन करून गावातील युवकांना रोजगार निर्माण करायचा आहे.रोजगार आणि वनसंपत्तीचा संगम साधून पुढच्या दहा वर्षांचे नियोजन करायचे आहे. गावाला सुजलाम-सुफलाम करण्याची आशा घेवून आलोय, अशी भावनिक साद घालून वनग्रामसाठी गावातील लोकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘ग्राम उदय ते भारत उदय’ उपक्रमांतर्गत देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त दुर्गम आदिवासीबहुल फुक्कीमेटा ग्रामपंचायतीला संत तुकाराम वनग्राम करण्यासाठी तथा ग्रामसभेला वनहक्काची जाणीव करण्यासाठी फुक्कीमेटा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत बुधवारी (दि.२0) सायंकाळी सात वाजता कृतीयुक्त ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी गावकर्‍यांशी संवाद साधताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
ग्रामसभेचे उद््घाटन आ. संजय पुराम यांनी केले. फुक्कीमेटा ग्रामपंचायतीचे सरपंच गजरू नेताम, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, सहायक वनसंरक्षक बिसेन, देवरीचे गटविकास अधिकारी एस.एन. मेश्राम, उपसरपंच भागचंद मोहबे, सामूहिक वन हक्क समितीच्या अध्यक्ष शारदा उईके, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष जीवनलाल तावाडे, तंटामुक्त गाव समितीचे निमंत्रक चंद्रकुमार हुकरे, माजी पंचायत समिती सदस्य मुक्ता शहारे मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रामसेवक आर.बी. बोरसरे व संचालन यु.आर. टेंभरे यांनी केले. आभार झोडे यांनी मानले. कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कर्मचारी तथा गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.