गोंदियात२३ विदर्भवाद्यांना अटक व सुटका

0
13

गोंदिया,दि. १ : येथील गांधी प्रतिमेजवळ आज रविवारी (ता. एक ) सकाळी साडेनऊला ‘विदर्भ‘ राज्याचा ध्वज फडकाविण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी २३ विदर्भवादी आंदोलकांना अटक केली. एका तासानंतर अटकेतील आंदोलकांची सुटका केली.

गत कित्येक दशकांपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी रेटून धरण्यात येत आहे. मात्र, राज्य आणि केंद्र शासनाने नेहमीच स्वतंत्र विदर्भाची स्थापना करण्याकडे दुर्लक्ष केले. ही मागणी अधिक प्रभावीपणे लावून धरण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रदिनी म्हणजेच रविवारी (ता. एक)  काळा दिवस पाळण्याचे विदर्भवाद्यांनी ठरविले. या दिवशी स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकाविण्यात येणार असल्याची माहिती विदर्भवादी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाèयांनी आदल्या दिवशी दिली होती. त्यानुसार विदर्भवादी आज, रविवारी सकाळी साडेनऊला शहरातील गांधी प्रतिमेजवळ एकत्र आले. त्यानंतर छैलबिहारी अग्रवाल व अ‍ॅड. कटरे यांनी गांधी प्रतिमेला पुष्पाहार अर्पण केले. दरम्यान, विदर्भ राज्याचा ध्वज फडकाविण्याची तयारी सुरू असतानाच पोलिसांनी ध्वज फडकाविण्यास मज्जाव करून २३ आंदोलकांना अटक केली. तथापि, एक तासानंतर आंदोलकांची सुटका केली. त्यामध्ये छैलबिहारी अग्रवाल, अ‍ॅड. टी. बी. कटरे, संतोष पांडे, राजेश बन्सोड, अ‍ॅड. अर्चना नंदघरे, अ‍ॅड. पराग तिवारी, अ‍ॅड. वैरागडे, राजधर भेलावे, अ‍ॅड. राजकुमार बोंबार्डे, अ‍ॅड. सुनीता चौधरी, सुंदरलाल लिल्हारे, मुकेश भांडारकर, डॉ. नितेश बाजपेयी, दीपक यादव, कमल बोंबार्डे, ए. एस. कुरेशी, डॉ. दीपक मिश्रा, देवेंद्र शर्मा, बलदेव सोनवाने, पुरूषोत्तम मोदी, उमेश दमाहे यांच्यासह अन्य विदर्भवाद्यांनी या आंदोलनात उडी घेतली होती.