वैनगंगेची पातळी खालावली गोंदिया व तिरोडा शहरात एकवेळ होणार पाणीपुरवठा

0
8

गोंदिया,दि.८ : गोंदिया आणि तिरोडा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने वैनगंगा नदीवरुन पाणीपुरवठा करण्यात येतो.सद्यस्थितीत वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असल्यामुळे या दोन्ही शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाèयांशी झालेल्या चर्चेतून घेतला आहे. कपात होणाèया पाण्यामुळे जून अखेर पर्यंत पाणीपुरवठा दररोज दोन वेळेऐवजी आता एक वेळ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गोंदिया शहराला डांगुर्ली गावाजवळ वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या पंप हाऊस मधून २४० एच.पी. पंपाद्वारे साडेसोळा किलोमीटर अंतरावरुन पाईपलाईनद्वारे कुडवा येथील जलशुध्दीकरण केंद्रावर पाणी आणण्यात येते. हे पाणी शुध्दीकरण केल्यानंतर भिमनगर, रामनगर, सिव्हील लाईन, गोल टाकी व ऑफिस टाकी येथे असलेल्या ५ जलकुंभाद्वारे ५ एम.एल. पाणी सकाळी व ५ एम.एल.पाणी सायंकाळी असे एकूण १० एम.एल.पाणी दोनवेळा शहराला पुरविण्यात येते. गोंदिया शहरात १२ हजार नळधारक असून १३५ लिटर पाणी दरडोई दरदिवशी देण्यात येते. महिन्यातून साधारणत: तीनशे ते सव्वातीनशे एम.एल.पाण्याची उचल गोंदिया शहरासाठी वैनगंगा नदीतून करण्यात येते.
तिरोडा शहराला पाणीपुरवठा हा कवलेवाडा गावाजवळील वैनगंगा नदीच्या काठावरील विहिरीतून करण्यात येतो. या विहिरीतून ५० एच.पी. पंपाद्वारे दररोज १.८ एम.एल.पाणी उचलण्यात येते. ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या जलशुध्दीकरण केंद्रात हे पाणी शुध्द करुन ८ लक्ष लीटर क्षमतेच्या जलकुंभाद्वारे दररोज दोनवेळा तिरोडा शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो.गोंदिया शहराला पाणीपुरवठा करणाèया डांगुर्ली गावाजवळ वैनगंगा नदीचा प्रवाह फारच कमी झाल्यामुळे पाण्याची आवक सुद्धा कमी झाली आहे. नदीपात्रात कच्चा बांध घालून पंप हाऊसजवळ पाणी अडविण्यात आले आहे. जवळपास नदीपात्रात दीड किलोमीटर थांबलेल्या पाण्याची क्षमता ही अंदाजे २०० एम.एल. आहे. परंतु दररोजची १० एम.एल. पाण्याची उचल व उष्णतेने पाण्याचे होणार बाष्पीभवन पाहता हे पाणी १५ ते २० दिवस पुरेल व नंतर पाणीपुरवठा करणे फार कठीण जाईल. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, उपलब्ध पाणीसाठा जास्तीत जास्त दिवस पुरविण्याच्या दृष्टीने होणारे बाष्पीभवन व पात्रात मुरणारे पाणी हा व्यय लक्षात घेता दोन ऐवजी एकवेळा पाणीपुरवठा केल्यास ३० टक्के कपात करुन एकवेळ पाणी दिल्यास हे पाणी मे व जून अखेरपर्यंत पुरेल असा अंदाज आहे. म्हणून गोंदिया शहराचा पाणीपुरवठा १२ मे पासून एकवेळ म्हणजे सकाळी ६.३० ते ७.३० असा करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाèयांशी चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी घेतला आहे.
तिरोडा शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाèया कवलेवाडा गावाजवळ वैनगंगा नदीत १ रेती पोत्यांचा बंधारा बांधण्यात आला आहे. तेथून फक्त ५ दिवसाचा पाणीपुरवठा होऊ शकतो. धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या धरणातील पाणी तेथे अडविण्यात येवून व तेथून पंपींगद्वारे तिरोडा शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या धरणातील पाण्याचा साठा पाहता तिरोडा शहराकरीता दररोज दोनवेळ ऐवजी एकवेळ सकाळी ६ ते ८ या वेळात पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे गोंदिया व तिरोडा शहरातील जनतेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर.पी.चंद्रिकापुरे यांनी केले आहे.