महाराष्ट्र लाईफ लाईन एक्सप्रेस सुरु करणार – डॉ.दिपक सावंत

0
25

गोंदिया,दि.१० : राज्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र लाईफ लाईन एक्सप्रेस सुरु करण्यात येईल. असे मत आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी व्यक्त केले.
९ मे रोजी आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांनी गोंदिया येथील लोकोशेडजवळ जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी आलेल्या लाईफ लाईन एक्सप्रेसला भेट दिली. यावेळी त्यांनी लाईफ लाईन एक्सप्रेसची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. एक्सप्रेसमध्ये सुरु असलेल्या मोतीबिंदु शस्त्रक्रियेची पाहणीसुध्दा केली.
क्युरादेव फार्मा प्रा.लि.च्या सौजन्याने राज्य सरकारच्या मदतीने आणि इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनच्या वतीने संचालित लाईफ लाईन एक्सप्रेस ही रेल्वे रुळावरील जगातील पहिले चालते-फिरते रुग्णालय आहे.
यावेळी आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांना या लाईफ लाईन एक्सप्रेस विषयीची माहिती इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठीया यांनी दिली. ४ ते २५ मे दरम्यान गोंदिया येथे होणारे हे या एक्सप्रेसचे १७२ वे शिबीर आहे. १९ राज्यात या एक्सप्रेसने ३१ वर्षात प्रवास करुन गोरगरीब व गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्याचे श्री.बांठीया यांनी सांगितले.
डॉ.सावंत यावेळी म्हणाले, राज्यातील दुर्गम, डोंगराळ, मागास, नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आदिवासी बहुल भागातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ही एक्सप्रेस जीवनदायी ठरणार आहे. विविध आजारांवरील शस्त्रक्रिया मोफत होणार असल्यामुळे गोरगरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची लवकरच भेट घेऊन महाराष्ट्र लाईफ लाईन एक्सप्रेस सुरु करण्याची कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.सावंत यांच्या लाईफ लाईन एक्सप्रेस भेटी दरम्यान आमदार गोपालदास अग्रवाल, इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष जयंतकुमार बांठीया, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, राज्याचे आरोग्य संचालक डॉ.मोहन जाधव, आरोग्य उपसंचालक डॉ.संजीव जायस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर, इम्पॅक्ट इंडियाचे डॉ.रजनीश गौर, जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे, राजकुमार कुथे, चंदू राऊत, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.