न.प.च्या रिंगणात सहा उमेदवार

0
17

गोंदिया : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील रिक्त पदासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि.१३) एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात सहा उमेदवार उरले आहेत. या पोटनिवडणुकीत उमेश मनोहर दमाहे व नागेश्‍वर राजेश दुबे हे दोघे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तर विनायक नत्थू खैरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून, लोकचंद सोमाजी रहांगडाले कॉंग्रेसकडून, दीपक सुधाकर बोबडे शिवसेनाकडून तर राजू विठ्ठलराव पारधी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत
प्रभाग क्रमांक १ मधील ‘ड’ गटातील सदस्य अनिल पांडे यांचा मृत्यू झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेतली जात आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दुसर्‍यांदा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकार्‍यांनी पोटनिवडणूक जाहीर केली. यांतर्गत सात उमेदवारांनी आपले १२ उमेदवारी अर्ज सादर केले होते. तर ३ मे रोजी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीत एकही अर्ज कापल्या गेला नव्हता. त्यामुळे सातही उमेदवार रिंगणात होते.
मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि.१३) पद्मकांत चौधरी यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यांचा अर्ज मागे घेण्यात आल्याने आता रिंगणात उर्वरीत सहा उमेदवार उरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या हा अर्ज मागे घेण्यात आल्याने आता निवडणुकीचे चित्रआणखी स्पष्ट झाले आहे. तर शनिवारी (दि.१४) उमेदवारांना अर्ज वाटप व उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आहे.