सिंचन प्रकल्प मार्गी लावणार ; जलसंपदा व जलसंधारणमंत्र्यांचे आश्वासन

0
6

चंद्रपूर : शेतकऱ्यांना सिंचनाच्या चांगल्या सुविधा निर्माण करून देण्यासाठी बांधकामाधीन सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रकल्पांना गती देण्यासाठी निधीसह लागणारी आवश्यक सर्व मदत तातडीने उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तसेच जलसंधारणाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला मंत्रीद्वयांसोबतच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार नाना शामकुळे, किर्तीकुमार भांगडिया, संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प व प्रकल्पांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. बांधकामाधीन व प्रस्तावित प्रकल्पांची माहिती त्यांनी जाणून घेतली. अधीक्षक अभियंता एम.जे.शेख यांनी जिल्ह्यातील हुमन या मोठ्या प्रकल्पासह मध्यम प्रकल्प तसेच उपसा सिंचन योजना व बॅरेजेसची माहिती दिली. काही प्रकल्प विविध प्रकारच्या मान्यतेसाठी अडले असून काहींना निधी नसल्याने कामे रखडली आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाच्या या अडचणी तात्काळ सोडविल्या जातील तसेच आवश्यक त्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे श्री.महाजन यांनी सांगितले. 

जलसंपदा विभाग शेतकऱ्यांशी निगडीत विभाग आहे. शिवाय पिण्याचे पाणीही या विभागामार्फत पुरविल्या जाते. त्यामुळे या विभागास पारदर्शक बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाण्याचे नियोजन करताना सूक्ष्म सिंचन पद्धतीला प्राधान्य दिले जात असून पाण्याचा होणारा 30 ते 40 टक्के अपव्यय थांबविण्यासाठी कार्यक्रम आखला जात असल्याचे श्री.महाजन यांनी सांगितले.

जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी जलसंधारण विभाग व जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून प्रकल्पनिहाय माहिती जाणून घेतली. यावेळी अधिक्षक अभियत्यांनी प्रकल्पांच्या अडचणी विषद केल्या. त्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिले. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रगतीचा आढावा जाणून घेताना जूनपर्यंत यासाठी उपलब्ध असलेला पूर्ण निधी खर्च करण्याचे निर्देश दिले.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही यावेळी जलसंपदा व जलसंधारणाच्या जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. जिल्ह्यात अधिकाधिक सिंचन क्षमता निर्माण होऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जलसंपदा व जलसंधारण मंत्र्यांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. मामा तलावाच्या दुरूस्ती शासनाच्या पुरेसा निधी राखून ठेवल्याने या तलावांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.