९० टक्के काम झालेले सिंचन प्रकल्प यावर्षी पूर्ण करु –ना. गिरीष महाजन

0
11

भंडारा दि.२६:- भंडारा व गोंदिया जिल्हयातील ९० टक्के काम पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने करुन असे प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्यात येतील.  यासाठी वनजमीन, भूसंपादन आणि निधीची अडचण तात्काळ मार्गी लावू, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
भंडारा व गोंदिया जिल्हयातील मोठे, मध्यम व लघुसिंचन प्रकल्पाचा आढावा आज जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आला. यावेळी श्री. महाजन बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार चरण वाघमारे, आमदार विजय राहांगडाले, आमदार संजय पुराम, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल, गोसेखुर्द प्रकल्प मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, भंडारा जिल्हाधिकारी धीरजकुमार, गोंदिया जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी,  जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेन्द्र निंबाळकर उपस्थित होते.
गोसेखुर्द प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण करायचे आहे.  प्रत्येक अधिकाऱ्यांकडे या प्रकल्पाची टप्पानिहाय अदयावत माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर भूसंपादन किती, खातेदार किती, निधी खर्च, प्रकल्पातील अडचणी इत्यादी अदयावत माहिती सर्व आमदारांना देण्यात यावी, अशा सूचना प्रधान सचिव श्री. चहल यांनी केल्या.
टेकेपार आणि सोंडयाटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे विदयुत बिलासाठी काही अनुदान शासनाने दयावे अशी मागणी आमदार चरण वाघमारे यांनी केली. मात्र प्रत्येक बाबीसाठी शासन पैसे देवू शकणार नाही. एका प्रकल्पाला सूट दिली तर सर्वच प्रकल्पासाठी अशी मागणी येईल आणि शासनाला हे परवडणार नाही, अशी भूमिका ना. महाजन यांनी मांडली.  त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी पट्टी भरावीच लागेल. आमदारांनी  पाणी पट्टी भरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरीत करावे तसेच याबाबत जनजागृती करावी असे आवाहन श्री. महाजन यांनी यावेळी केले.
बावनथडी प्रकल्पाचे कालव्यासाठी भूसंपादनाच्या रजिस्ट्रीचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. तसेच हा प्रकल्प सर्वार्थाने मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करु. यासाठी शासनाने २०० कोटी रुपये दिले आहेत, असे श्री. सुर्वे यांनी सांगितले.
गोंदिया जिल्हयातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेताना आमदार विजय राहांगडाले यांनी धापेवाडा सिंचन प्रकल्पाबाबत सदयस्थिती विचारली. धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे अंदाजपत्रक एका आठवडयात सादर करु. तसेच बोदलकसा रायझिंग मेनच्या कामाचे अंदाजपत्रकही एक आठवडयात तयार करुन देवू. याबाबत कालव्यांच्या ऐवजी बंद पाईपलाईन मधून पाणी देण्याचे शासनाचे धोरण चांगले आहे. यामध्ये भूसंपादन न करता कामे करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे श्री. सुर्वे यांनी सांगितले.
कलपाथरी, कटंगी, निमगांव, भुराटोला या प्रकल्पांचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. जेथे मंत्रीमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता आहे आणि निधीची गरज आहे त्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावा. अशा सूचना मंत्री महोदयांनी दिल्यात.
सिंचन प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासन लवकरच ४०० कोटी रुपये उपलब्ध करुन देणार आहे. या निधीतून प्रकल्पांची देखभाल दुरुस्तींची कामे पूर्ण होवून प्रकल्प पूर्ववत कार्यान्वित होतील, अशी माहिती मंत्री महोदयांनी यावेळी दिली.
भिवरटोला कालव्याचे काम रेल्वेलाईनमुळे अडले आहे. रेल्वेलाईनच्या खालून पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. रेल्वेची मंजुरी मिळताच हे काम सुरु होईल. असे श्री. सुर्वे यांनी सांगितले.
या बैठकीला जलसंपदा विभागाचे भंडारा-गोंदिया जिल्हयातील सर्व अधिकारी उपस्थित होते.