अपूर्ण सिंचन प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार – गिरीश महाजन

0
10

तिरोडा,दि.२६ : राज्यातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृध्द करण्यासोबतच त्यांना न्याय देण्यासाठी राज्यातील अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
२६ मे रोजी तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या टप्पा-२ च्या प्रकल्पास भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात  महाजन बोलत होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार भजनदास वैद्य, गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळ आंबाडी(भंडारा)चे अधीक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर, मदन पटले, उपसा सिंचन योजना तिरोडाचे कार्यकारी अभियंता वाय.आर.यासटवार यांची प्रमुख उपस्थिती होती.महाजन यांनी धापेवाडा बॅरेजची पाहणी करुन उपसा सिंचन योजनेच्या प्रगतीबाबतची माहिती जाणून घेतली.
धापेवाडा उपसा सिंचन योजना ही तीन टप्प्यात असल्याचे सांगून महाजन म्हणाले, हा आगळा वेगळा प्रकल्प आहे. पुराच्या पाण्यावर आधारित हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या तीनही टप्प्याचे काम पूर्ण होताच ९० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्प पूर्ण करतांना अनेक अडचणी आहेत. त्या मार्गी लागत आहे. तीन टप्प्याची ही योजना तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करीत असल्याचे सांगून जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, उन्हाळी व रब्बी पिके घेण्याचे प्रमाणही या जिल्ह्यात फार कमीच आहे. इथल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांची अर्थव्यवस्था बदलण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आ.रहांगडाले म्हणाले, तिरोडा तालुक्याच्या हरितक्रांतीसाठी धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. टप्पा-२ चे काम पूर्ण झाल्यास तिरोडा तालुक्याला सिंचनासाठी पाण्याची चांगली व्यवस्था निर्माण होईल. शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी धापेवाडा प्रकल्पाची उंची व क्षमता वाढविली तर निश्चितच शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळेल. टप्पा-२ चे काम पूर्ण करण्यासाठी ५०० कोटीची आवश्यकता असून यावर्षी १०० कोटीची तरतूद केली तर प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकातून श्री.नार्वेकर यांनी धापेवाडा बॅरेजचे काम २०१३ मध्ये पूर्ण झाल्याचे सांगितले. येत्या तीन वर्षात टप्पा-२ आणि टप्पा-३ चे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. धापेवाडा उपसा सिंचन योजनेची वस्तूस्थिती, अडचणी आणि लागणारा आवश्यक निधी याबाबतची माहिती जलसंपदा मंत्री यांना अवगत केल्याचे त्यांनी सांगितले