बल्लारपूर मतदारसंघ होणार देशातील पहिला हागणदारीमुक्त -ना.मुनगटींवार

0
9

चंद्रपूर,दि.11- हागणदरी मुक्त योजनेत बल्लारपूर हे विदर्भात प्रथम आले असून आता या पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. बल्लारपूर, मूल व पोंभूर्णा हे तीनही तालुके शंभर टक्के हागणदारी मुक्त करून २०१९ पर्यंत बल्लारपूर विधानसभा मतदार संघ देशातील पहिला हागणदारीमुक्त मतदार संघ करण्याचा संकल्पसोबतच देशातील पहिले हरित क्षेत्र म्हणून बल्लारपुरला ओळख प्राप्त करून देणार असल्याचा निर्धार पालकमंत्री व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

ते बल्लारपूर शहरातील २४ कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. बल्लारपूर शहरातील प्रत्येक विकास कामाचे भूमिपूजन त्या त्या वार्डमधील पाच नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. एकूण २३ कोटी ८३ लाख ५७ हजार रुपये खर्चाच्या विकास कामांचा यात समावेश आहे. मोकळ्या जागेचा विकास करतांना संरक्षण भिंत बांधणे, पदपाथ, योगाशेड, बगीचा विकास व ओटा बांधकाम करण्यात येणार आहे. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, आपण निवडून आलो तेव्हा बल्लारपूर शहराच्या विकासासाठी शंभर कोटी रूपये देणार असल्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त निधीची कामे आता सुरु आहेत.
मागेल त्याला पाणी या धोरणानुसार बल्लारपूर शाहरासाठी ४० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना बनविण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बलारपुरच्या सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी शहरात भव्य नाट्यगृह उभारण्यात येत असून येत्या सहा महिन्यात नाट्यगृहाचे उदघाटन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

 देशात बल्लारपुरला ग्रीण बल्लारपूर म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे नमूद करून पालकमंत्री म्हणाले की, येत्या 1 जुलै रोजी राज्यात 2 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प शासनाने केला आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी बल्लारपूर मतदार संघात जास्तीत जास्त वृक्ष लावून ग्रीण बल्लारपूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उलस्थित होते.