डॉ.आंबेडकर टिचर्स असोसिएशन राज्यपालांना भेटणार

0
14

गडचिरोली, दि.१७: गोंडवाना विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या सहायक प्राध्यापकांच्या भरतीप्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरु झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशने राज्यपालांकडे लेखी तक्रार केली असून, लवकरच संघटनेचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे.
गोंडवाना विद्यापीठाने २७ ऑगस्ट २०१५ रोजी जाहिरात प्रकाशित करुन गणित, इंग्रजी, समाजशास्त्र, वाणिज्य व इतिहास अशा पाच विषयांतील सहायक प्राध्यापकांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागितले. पुढे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर २६ एप्रिल २०१६ ते १ जून २०१६ या कालावधीत पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत घोळ झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर विद्यापीठ वर्तुळात खळबळ माजली. विद्यापीठाने निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केल्याच्या दुसऱ्याच दिवशी संबंधितांना नियुक्तीपत्रही पाठविले. एखाद्या उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यावर आक्षेप मागविण्याचा ‘सरकारी संकेत’ आहे. परंतु या संकेतास बगल देत विद्यापीठ प्रशासनाने घाईघाईने संबंधितांना नियुक्तीपत्र पाठविले. त्यामुळे विद्यापीठाने एवढी घाई कशासाठी केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवड प्रक्रियेदरम्यान काही अनियमितता होत असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशने राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली. आता संघटनेचे शिष्टमंडळ प्रत्यक्षात जाऊन राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव प्रा. प्रमोद शंभरकर यांनी दिली. दरम्यान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसही या भरतीविरोधात आवाज उठविणार असल्याची माहिती आहे.