वैयक्तिक वनपट्टे धारकांच्या शेतासाठी खास योजना बनवा- देवरा

0
22

गडचिरोली : वैयक्तिक वनहक्क पट्टे देण्यात आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतीमधील उत्पन्न दुपटीने वाढण्याच्या दृष्टीकोनातून खास प्रस्ताव तयार करण्यात यावा. 2 वर्षात 30 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचे नियोजन करावे, असे निर्देश आदिवासी विभागाचे सचिव रामगोपाल देवरा यांनी दिले.

गडचिरोली जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यात अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. अशा प्रकारच्या प्रस्तावाला खास बाब म्हणून मंजुरी दिली जाईल, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, गडचिरोली वनवृत्त मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार, उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तूला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल आदी उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यात वैयक्तिक वनहक्कांतर्गत 30 हजार 700 आदिवासी बांधवांना 84 हजार हेक्टर इतकी जमीन आतापर्यंत देण्यात आली आहे. या सर्वांना हे वनपट्टे शेतीयोग्य करुन सहाय्य दिल्यास त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढू शकते. कृषी विभागाने वर्षाला 15 हजार शेतकऱ्यांना भूसुधार आणि इतर तांत्रिक मदत देण्याचे नियोजन करावे असा 2 वर्षाचा नियोजित आराखडा सादर करावा. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य होईल, असे ते म्हणाले.

गडचिरोली जिल्ह्यात 363 ग्रामपंचायतींना 16 कोटी 84 लक्ष रुपये निधी थेट प्रदान केला आहे. यातून प्रस्तावित कामांचा आढावा घेताना ते म्हणाले की, दिलेल्या निधीचा योग्य विनियोग करण्यात यावा यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीची माहिती घ्यावी व त्यांना कामांबाबत मार्गदर्शन करण्यात यावे.

केवळ यंत्रणा पुरवठा करीत आहेत म्हणून खरेदी करण्यात येऊ नये तर प्रत्यक्षात ग्रामपंचायतींना दीर्घकाळ लाभ होईल अशा कामांवर हा निधी खर्च होईल याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी. ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या अंगणवाड्यात चालू असलेल्या अमृत आहार योजनेसोबत पूरक आहार पुरवण्यासाठी हा निधी खर्च केला जाऊ शकतो. तसेच गावात हॅचरिज सारख्या उद्योगांवर यातून खर्च शक्य आहे. जिल्ह्यात अंगणवाड्या तसेच आश्रमशाळांमध्ये जेथे जागा आहे त्या ठिकाणी भाजीपाला लागवड करण्याच्या दृष्टीकोनातून 5 प्रकारच्या भाज्यांची बिजे पुरविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नायक यांनी यावेळी दिली.

ए.पी.जे. अब्दूल कलाम अमृत आहार योजनेसाठी मंजूर तरतुदीच्या 80 टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. हा निधी थेट अंगणवाड्यांच्या खात्यात देण्यात यावा, असे निर्देश श्री. देवरा यांनी दिले. ही योजना एकही दिवस बंद पडणार नाही याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात या अंतर्गत 1830 अंगणवाड्या पात्र आहेत. यापैकी 1506 मध्ये ही योजना सुरु आहे. उर्वरित ठिकाणी ही योजना त्वरित सुरु करण्याचे निर्देश यावेळी सचिवांनी दिले. अंगणवाड्यांमध्ये या योजनेत अन्नपदार्थ तयार करण्यासाठी शेगड्या प्राप्त आहेत. अंगणवाड्यांनी शिधापत्रिका लगेच बनवाव्यात. त्यांना हिन्दुस्थान पेट्रोलियमतर्फे 2 सिलींडरचे एल.पी.जी. कनेक्शन देण्यात येत आहे. या अन्नपदार्थासाठी गहू आणि तांदूळ बाजारातून न खरेदी करता सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणालीतून देण्यात येणार आहे. या कामासाठी जिल्ह्याला 11 कोटी 95 लक्ष रुपये निधी देण्यात आला आहे.

अंगणवाड्यांमध्ये आठवड्यातून 2 दिवस अंडी व केळी पुरवठा करण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. यात स्थानिकस्तरावर खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येतील, असे देवरा यावेळी म्हणाले.
जिल्ह्यात 11 आश्रमशाळा आणि 12 वसतीगृहे यांच्या इमारतींचा प्रस्ताव आहे. यापैकी 5 इमारती पूर्ण झाल्या आहेत. ताडगांव, व्यंकटापूर, धानोरा, मोहली येथील इमारती या आठवड्यात पूर्ण होतील, असे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी सांगितले.

2 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत सुरु असलेल्या वृक्ष लागवड तयारीचा आढावाही सचिव देवरा यांनी घेतला. अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी आभार प्रदर्शन केले.