महिला पोलिस निरिक्षकाला लाच घेतांना अटक

0
8

नागपूर.दि.22-अंबाझरी पोलीस ठाण्यातील एक महिला पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकली. मंगळवारी अंबाझरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उप निरीक्षक अर्चना लक्ष्मणराव वाघमारे (वय ३३) हिला २० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली. न्यायालयात आरोपींच्या बाजूने अभिप्राय देण्याकरिता अर्चना वाघमारे हिने ५० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध अंबाझरी पोलिसांत गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उप निरीक्षक अर्चना वाघमारे करत होती. या प्रकरणात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांना उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिली असून सत्र न्यायालयात स्थायी जामीनासाठी त्यांनी अर्ज केला होता. या अर्जा संबंधी आरोपींच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी अर्चना वाघमारे हिने तब्बल ५० हजाराच्या लाचेची मागणी केली होटी. मात्र तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली, त्यानुसार पडताळणी करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अर्चना वाघमारे हिला तडजोडीअंती २० हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. आरोपी अर्चना वाघमारे हिच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी, भावना धुमाळे, चन्द्रनाग ताकसांडे, वैभव जगणे यांनी केली.