भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीत ६७ टक्के मतदान

0
8

गोंदिया,दि.२१- भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील भंडारा-गोंदिया लोकसभा (Bhandara-Gondia Lok Sabha) निवडणूकीकरीता १९ एप्रिल रोजी जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. या निवडणूकीत ६७ टक्के मतदान झाले. २ हजार १३३ मतदान केंद्रावरून १२ लाख २४ हजार ९५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १९ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत सर्वाधिक मतदान साकोली विधानसभा क्षेत्रात ७१.३२ टक्के झाला. दि.४ जून २०२४ रोजी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजनी होणार असून मतदार संघातील जनतेच्या नजरा लागलेल्या आहेत. मतदार संघातील ६७ टक्के मतदारांनी १८ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद (EVM off) केले आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीकरीता यावेळी १८ उमेदवार रिंगनात होते. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीकरीता १९ एप्रिल रोजी मतदान शांततेत पार पडले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांच्या मतदानाच्या रांगा दिसून येत होत्या. उष्णतेच्या प्रहारीत दुपारी मतदानाचा वेग काही प्रमाणात मंदावला होता. सायंकाळी मात्र मतदानाला वेग येवून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. काही मतदान केंद्रावर ईव्हीएम बिघाडामुळे तसेच मशीनच्या संथ गतीमुळे मतदारांची गैरसोय झाली. तर ईव्हीएम बिघाडामुळे काहीकाळ मतदान प्रक्रिया बाधित झाली होती.तर काही मतदार जिवंत असताना त्यांच्या नावापुढे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याने गोंधळ उडाला.निवडणुक कार्याकरीता अतिरिक्त घेतलेल्या २० टक्के कर्मचारी वर्गाला आधी पोस्टल मतदान मंजूर केल्याने त्यांना बुुथवर मतदान करताच आले नाही.तर निवडणुक आयोगाने पोस्टलही नाकारल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ गोंदिया जिल्ह्यात आली.

१२ लाख २४ हजार ९५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

त्यामुळे काही केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान पार पडले. यामध्ये तुमसर विधानसभा क्षेत्रात ६७.५३ टक्के, भंडारा ६६.०६, साकोली ७१.३२, अर्जुनी मोर ७०.८७, तिरोडा ६५.८३ तर गोंदिया विधानसभा क्षेत्रात ६३.७४ टक्के मतदान झाले. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील १८ लाख २७ हजार १८८ मतदारांपैकी ६ लाख २६ हजार ०५७ पुरूष व ५ लाख ९८ हजार ८९३ स्त्री व इतर ६ अशा १२ लाख २४ हजार ९५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान शांततेत व निर्भिडपणे पार पडावे याकरीता पोलीस प्रशासनाकडून सर्वच मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त (Police arrangements) ठेवण्यात आला होता. जिल्ह्यात अनुचित घटना घडू नये. मतदान शांततेत पार पडवा याकरीता वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलीस प्रशासनातील अधिकारी लक्ष ठेवून होते. या लोकसभा निवडणूकीत महिला नवमतदार तसेच दिव्यांग मतदारात (Disabled voters) उत्साह दिसून आला.

मतदाराची टक्केवारी घसरली
सन २०१९ मध्ये झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीत १८ लाख ०८ हजार ७३४ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत १८ लाख २७ हजार १८८ मतदारांपैकी १२ लाख २४ हजार ९५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील लोकसभा निवडणूकीपेक्षा या निवडणूकीत १८ हजार ४५४ मतदार संख्या वाढली असताना मात्र सन २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत झालेल्या मतदानापेक्षा या निवडणूकीत ९ हजार ९४० मतदारांचे मतदान कमी झाले. या लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी घसरल्याने चिंतेची बाब ठरत आहे.