वृक्ष लागवडीसोबतच त्याचे संवर्धनही महत्वाचे -पालकमंत्री बडोले

0
13

डव्वा येथे वृक्ष लागवड कार्यक्रम

गोंदिया दि.१ :- वनमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यात आज २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे असून यातून प्रत्येकाने पर्यावरण संतूलनासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. आता वृक्ष लागवडीसोबतच त्यांचे संवर्धनही करणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
१ जुलै रोजी २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत डव्वा येथील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेसमोरील वन विभागाच्या जागेवर जैवविविधता समिती डव्वाच्या वतीने आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून पालक सचिव डॉ. पी.एस.मीना यांची तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जि.प.सदस्य गंगाधर परशूरामकर, सडक/अर्जुनीच्या पंचायत समिती सभापती कविता रंगारी, पंचायत समिती सदस्य जयशिल जोशी, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक पी.एस.बडगे, डव्वाच्या सरपंच शारदा किरसान,भाजपचे रविकांत बोपचे,लिलेश रहांगडाले यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले, जिल्हयात या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत ९ लाख ६० हजारपेक्षा जास्त वृक्ष लागवडचा संकल्प जिल्हयाने केला आहे. वृक्ष हे आपले मित्र आहेत. त्यांच्या संवर्धनाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक कुटूंबाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
डॉ. पी.एस.मीना म्हणाले, आजचा दिवस हा विशेष आहे. झाड लावा झाड जगवा याचा बोध या प्रत्येकाने घेतला पाहिजे. आजपर्यंत वृक्षतोड खूप झाली आहे. त्यामुळे भविष्यात वृक्षतोड होणार नाही याची काळजी घ्यावी. वृक्षांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळते त्यामुळे जिवंत राहण्यास वृक्षांची महत्वाची मदत होते. वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम इथेच न थांबवता आणखीही यापुढे मोठ्या संख्येने झाडे लावावे व त्याचे संगोपन प्रत्येकाने करावे. झाडाचे अनेक फायदे असल्यामुळे त्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
प्रास्ताविकातून उपवनसंरक्षक डॉ. रामगावकर माहिती देतांना म्हणाले, डव्वा येथील वनविभागाच्या १५ हेक्टर जमीनीवर १६ हजार झाडे लावण्यात येत आहेत. झाडांची काळजी व त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी डव्वा येथील जैवविविधता समितीकडे देण्यात आली आहे. भविष्यात या जमिनीवर वनऔषधीची झाडेही लावण्यात येतील. इथे चांगले जंगल या वृक्षलागवडीतून निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, डव्वा येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी, जैवविविधता समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार विलास चव्हाण यांनी मानले.