शासकीय मुद्रणालयाच्या जागेवर बांधणार इमारत

0
12

नागपूर : शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार इमारत जीर्ण झाल्यामुळे त्या जागेवर बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, समितीची पहिली बैठक गुरुवारी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात पार पडली.
विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार इमारतीचा (पीपीपी) तत्त्वावर पुनर्विकास करण्यासाठी शासनाला शिफारस करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी सदर समितीचे सदस्य, शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार मुंबईचे संचालक परशुराम गोसावी, शासकीय मुद्रणालयाचे उपसंचालक मनोहर गायकवाड, शासकीय मुद्रणालय व्यवस्थापक, नागपूरचे य. या. दुधगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी मुख्य अभियंता प्रशांत नवघरे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सिद्धीकी, कार्यकारी अभियंता श्रीमती संगीता जैस्वाल, संजय इंदूरकर, शासकीय कारागृह मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुरेश मेश्राम, संघटनेचे प्रतिनिधी राजीव श्रीखंडेवार, सल्लागार प्रल्हाद गावंडे उपस्थित होते.