सोंड्याटोला सिंचन प्रकल्प सुरू करा अन्यथा आंदोलन : राजेंद्र पटले यांचा इशारा

0
10

तुमसर : तालुक्यातील शेतकर्‍यांना वरदान ठरणारा सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प थकित विद्युत बिलामुळे बंद पडला आहे. थकित बिल शेतकर्‍यांकडून पाणीपट्टीच्या स्वरूपात वसूल करावे, असा शासनाचा हट्टहास आहे. शेतकरी पैसे भरणार कुठून, असा प्रश्न करीत सोंड्याटोल्याचे थकीत विद्युत बिल माफ करून प्रकल्प सुरूकरावे, अन्यथा शेतकर्‍यांसह आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा शिवसेनाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी दिला.
आजघडीला शेतकर्‍यांना शेती करणे परवडत नसल्यामुळे दिवसेंदिवस शेतकर्‍यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी हा कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडतच असतो. त्यात धानाला मिळत असलेल्या अति अल्प भावामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५0 पैसे पेक्षाही कमी आणेवारी आली असताना शेतकर्‍यांकडून थकीत वीज बिल वसुल करणे योग्य नाही.
एकीकडे सरकार धनाढय़ लोकांचे थकित बिल चुटकीत माफ करते, मग शेतकर्‍यांचे का नाही, असा प्रश्न उपस्थित करित सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेवरील थकीत असलेले ३५ लाख रूपयांचे विद्युत बिल सरसकट माफ करण्यात यावे, धानाला तीन हजार रूपये हमीभाव दिल्यानंतरच शेतकर्‍याकडून पाणी पट्टीकर वसुल करावा, तोपर्यंत शेतकर्‍याकडून कसलीही वसुली करू नये, असा प्रस्ताव शासन दरबारी मांडण्यात यावा याकरीता शिवसेना प्रमुखांकडे निवेदन देण्यात आले. शासनाने त्वरीत थकित विद्युत बिलाचे भरणा करून शेतकर्‍यांकरिता पाण्याचा उपसा तात्काळ सुरू करावा, अन्यथा २३ जुलै रोजी सिहोरा येथे शेतकर्‍यांसोबत आंदोलन करून रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा राजेंद्र पटले यांनी दिला आहे.