चंद्रपुरातील जनजीवन विस्कळीत

0
20

चंद्रपूर,दि.09- जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून सुरु असलेल्या संततधारमुळे जनजीवन प्रभावित झाले असून नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक बंद झाली. सावली तालुक्यात सर्वाधिक २२१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.पोंभूर्णा तालुक्यात रस्ता वाहून गेल्याने येथील आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला.तर चंद्रपूर-अहेरी बसफेरी पुरामुळे बंद कराव्या लागल्या.
गुरुवारच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. संततधार पावसाचे परिणाम शनिवारला दिसायला लागले. पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. सिंदेवाहीकडून नागभीड, चिमूर येथे जाणारे मार्ग पूर्णपणे बंद झाले. केळझर मार्गावरील नदीच्या पुलावरून पाणी जायला लागल्याने मूलकडे जाणारा मार्गही बंद झाला. चिमूर-ब्रह्मपुरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तळोधी आणि जनकापूरजवळील नाल्याला उधाण आल्याने या मार्गावरील वाहतूकही प्रभावित झाली.
सावली तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे तब्बल ८१ घरांची पडझड झाली असून, पाच गावांचा संपर्क तुटला. नागभीड शहरात पावसामुळे अनेक वॉर्डात पाणी साचले. सिद्धिविनायक कॉलनी, मुन्नाभाई नगर, समता कॉलनी आदी परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. चिमूर तालुक्यातील तिरखुरा या गावातील कमलाबाई बालाजी ढोणे (वय ६०) या वृद्धेचा शुक्रवारी घरातील भिंत कोसळून मृत्यू झाला.
पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा-चेकनवेगाव या दोन गावांना जोडणारा कच्चा रस्ता पावसामुळे वाहून गेला. यामुळे पुन्हा एकदा या परिसरातील आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे. पोंभूर्णा-वेळवा मार्गावरील उमा नदी दुथडी भरली. मूल शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरले. यामुळे शासकीय कार्यालयांचा परिसर पूर्णपणे जलमय झाला. चिमूर, पोंभूर्णा तालुक्यातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा प्रभावित झाला. पावसामुळे पेरणीची कामेही आता लांबणीवर टाकण्यात आली आहेत. भद्रावती आणि वरोरा तालुक्यात तुरळक पावसाची रिपरिप सुुरू होती. मात्र, यामुळे जनजीवन विस्कळित झाल्याची माहिती नाही. पावसामुळे जिल्ह्यातील जलाशय मात्र तुडुंब भरले आहे.
हवामान विभागाने ८ ते १० जुलै दरम्यान चंद्रपूरसह विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. लोअर वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले. त्याचा विसर्ग वर्धा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेला आहे. तसेच गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले आहे. त्यामुळे वैनगंगा नदीमध्ये या धरण्यातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जिल्ह्यातील वर्धा आणि वैनगंगा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सोबत चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या इरई नदी काठावरील नागरिकांनी सावध राहावे, असे प्रशासनाने कळविले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांक ०७१७२-२५११९७ संपर्क साधावा असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.