‘आनंद सागर’ला आणखी ३० वर्षांचा भाडेपट्टा !

0
7

शेगाव , दि.20 – शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या ‘आनंद सागर’ या मनोहारी प्रकल्पाचा भाडेपट्टा पुढील ३० वर्षांसाठी वाढवून देण्याचा निर्णय शासनाने १९ जुलै रोजी घेतला आहे.

संत नगरी शेगावात श्री गजानन महाराज संस्थानने बाळापूर मार्गावरील शासनाच्या २५३ एकराच्या जागेत विज्ञान आणि अध्यात्माच्या पायावर एक मनोहारी उद्यान ‘आनंद सागर’ या नावाने तयार केले आहे. या प्रकल्पाला १७ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून आतापर्यंत ४० लाखाच्या जवळपास भाविक व पर्यटकांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे. सुरुवातीला शासनाने ही जमिन १५ वर्षाकरीता संस्थानला भाडेपट्टयावर हस्तांतरित केली होती. त्यानुसार २६ डिसेंबर २०१४ रोजी या जागेची लीज संपली. त्यानंतर श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव नगर परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा याशिवाय विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर जागेची लीज वाढून देण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केले. तसेच तत्कालीन खा. आनंदराव आडसुळ आणि ना. भाऊसाहेब फुंडकर यांनीही यासाठी पाठपुरावा केला. दरम्यान आनंदसागरला देण्यात आलेल्या जमिनीसाठी नाममात्र एकरुपये भाडे आकारण्यात आले आहे. तसेच १०१.३२ हेक्टर आर जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४० व महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७१ च्या नियम ५,६ व ७ मधील तरतूदी अन्वये श्री गजानन महाराज संस्थान यांना प्रदान करण्याचा निर्णय शासनाने १९ जुलै २०१६ रोजी घेतला आहे.