तिरोडा पालिकेच्या प्रभाग फेररचनेत दलित समाजावर अन्याय

0
10

तिरोडा,दि.25: नगर परिषदेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात प्रभाग रचना करताना तिरोडा नगर पालिकेतील काही दबंग नगरसेवकांना फायदा होईल याप्रमाणे प्रभाग रचना करुन बहुसंख्य दलित वस्त्यांना अल्पसंख्याक करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दलित वस्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भाषा देखील तिरोड्यातील काही दलित वस्त्यांमध्ये बोलली जात आहे.
प्रभाग क्रमांक पाच मध्ये अनुसूचित जातीची संख्या ९३८ आहे. प्रभाग सहामध्ये ३0५ तर प्रभाग ८ मध्ये अनुसूचित जातीची संख्या २३६ एवढी आहे. या तिन्ही प्रभागांची अनुसूचित जातींची एकूण संख्या १४७९ होते. यात प्रभाग ७ मधील २९३ या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचा समावेश केल्यास अनुसूचित जातींची संख्या १७७२ होते. विशेष म्हणजे, अनुसूचित जातीची संख्या एकाच भागात एकत्रित आहे. मात्र त्या भागाला विभक्त केल्यामुळे सर्वात मोठी संख्या असलेल्या भागातील अनुसूचित जातीची संख्या कमी झालेली आहे. ■ शहरातील जुनी वस्ती, रेल्वे चौकीच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात दलितांची संख्या आहे.त्यातच जुन्या वस्तीमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. असे असतानाही जुन्या वस्तीतील दलित वस्तीला तीन प्रभागात विभक्त करण्यात आले. यातील एक भाग प्रभाग पाचमध्ये, एक भाग प्रभाग आठमध्ये आणि एक भाग प्रभाग सहामध्ये विभक्त करण्यात आला आहे. अनुसूचित जातीच्या एकाच वस्तीचे विभाजन केल्यामुळे वॉर्डातील स्वच्छता व विकास कामांकडे सतत दुर्लक्ष होईल असे मत व्यक्त करुन दलित वस्त्यांची विभागणी करु नये, अशी या वस्तीतील नागरिकांची मागणी आहे. उल्लेखनिय म्हणजे, राज्य निवडणूक आयोगाने अनुसूचित जाती आणि जमातींच्या वस्त्यांचे विभाजन न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
प्रभाग रचना करताना प्रत्यक्षात काम करणारी पालिकेतील यंत्रणा मुख्याधिकार्‍यांऐवजी नगरसेवकांच्या मर्जीनुसारच कार्यरत असल्याचे तिरोडा येथील प्रभाग रचनेवरुन दिसून येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने प्रभागाची रचना करताना ज्या नगर परिषदेची सदस्यसंख्या विषम असेल अशा नगर परिषदेचा शेवटचा प्रभाग तीन सदस्यांचा ठेवण्याचे निर्देश दिले. तिरोडा शहरातील प्रभाग क्रमांक आठ हा शेवटचा प्रभाग आहे. मात्र या प्रभागात तीन सदस्य न ठेवता प्रभाग क्रमांक पाच मध्ये तीन वॉर्डाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रभागात तीन सदस्य न ठेवता प्रभाग क्रमांक पाचमध्ये तीन वॉर्डाचा समावेश करण्यात आला आहे.
नगर परिषदेच्या आठही प्रभागातील लोकसंख्या २५ हजार १८१ आहे.एका वॉर्डासाठी ढोबळमानाने ही संख्या दीड हजार एवढी येते. दोन वॉर्डात साधारणत: ३ हजार लोकसंख्या येईल. मात्र नगर परिषदेने ज्या प्रभागात तीन वॉर्डाचा समावेश केला त्या वॉर्डातील लोकसंख्या २ हजार ८00 दाखविली, तर ज्या प्रभागात केवळ दोन वॉर्डाचा समावेश आहे अशा प्रभागात ४ हजार ६४१ एवढी लोकसंख्या दाखविली आहे. ही आकडेवारी प्रकाशित केलेल्या दोन वेगवेगळ्या परिशिष्टांवर एकाच अधिकार्‍याची स्वाक्षरी आहे.त्यामुळे आकडेवारी संदर्भातही नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.
प्रभाग रचना करताना उत्तर दिशेकडून सुरुवात करुन पुढे इशान्य, त्यानंतर पूर्व, पश्‍चिम आणि शेवट दक्षिणेत करावा. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता ठेवावी, असे निर्देश आहेत. प्रत्यक्षात प्रभाग रचना करताना शासनाचे निर्देश सोडून उत्तर-पूर्व-दक्षिण आणि शेवट पश्‍चिमेकडे करण्यात आला. त्यामुळे जवळपास सर्वच वॉर्ड नागरिकांसाठी गैरसोयीचे झालेले आहे.
त्यातच वॉर्डाचे सीमांकन करताना प्रगणक गटाला विशेष महत्व देण्यात आले. गुगल मॅपवर प्रगणक गट दर्शविण्याचे सुद्धा निर्देश आहेत. मात्र प्रगणक गट ऑनलाईन उपलब्ध नाहीत. त्यामुळे नगर परिषदेने कोणत्या आधारावर सीमांकन केले, असा सवाल शहरात उपस्थित केला जात आहे. जर प्रगणक गटांची माहिती पालिकेकडे उपलब्ध आहे तर त्यांनी आक्षेप घेण्यासाठी प्रगणक गटाची माहिती का प्रकाशित केली नाही?नकाशात सुद्धा प्रगणक गटाची माहिती का देण्यात आली नाही? असे अनेक सवाल करण्यात येत आहेत. विद्यमान नगरसेवकांना पुरक होईल यासाठी अशाप्रकारे माहिती दडविण्यात आल्याचा सुद्धा नागरिकांचा आरोप आहे.
प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक सहामध्ये एकाच प्रगणक गटाचा समावेश करण्यात आला. प्रभाग क्रमांक सात मध्ये १८ ते २४ प्रगणक गटांचा समावेश आहे. परंतु यातून २0 क्रमांकाचा प्रगणक गट वगळून त्याला प्रभाग क्रमांक एक मध्ये घालण्यात आले. प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रगणक गट ३९ घेण्यात आले. हाच ३९ क्रमांकाचा प्रगणक गट प्रभाग क्रमांक चारमध्ये सुद्धा घेण्यात आलेला आहे. अशाप्रकारे केलेले प्रभाग बहुसंख्य लोकांना अल्पसंख्यक करणारे असून यात बदल करण्याची मागणी केली जात आहे.