समाधान शिबिरामुळे शासन, यंत्रणा व जनतेतील दुरावा कमी होण्यास मदत- डॉ.सूर्यवंशी

0
6

अर्जुनी/मोर,दि.२७ : विविध योजनांचा लाभ हा गरजू लाभार्थ्याला मिळाला तर त्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. समाधान शिबीरातून लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळाल्यास त्याला योजनांचा लाभ घेणे सोयीचे होते. अशा प्रकारच्या समाधान शिबीरामुळे शासन, विविध यंत्रणा व जनतेतील दुरावा कमी होण्यास मदत होत आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
आज २७ जुलै रोजी अर्जुनी/मोरगाव येथील प्रसन्न सभागृहात महाराजस्व अभियानांतर्गत महासमाधान शिबीराच्या पूर्व तयारी निमित्ताने आयोजित दिव्यांग स्वावलंबन अभियान समाधान शिबीराचे उदघाटक म्हणून डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी माजी आमदार दयाराम कापगते, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेवराव डोंगरवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, जि.प.सदस्य मंदा कुमरे, तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य रामलाल मुंगनकर यांची प्रमुख अतिथी म्हणून तर मंचावर तहसिलदार सिध्दार्थ भंडारे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी समाधान शिबिरात नागरिकांचे समाधान ज्या प्रमाणे करीत आहे त्या प्रमाणे कार्यालयात कामानिमीत्त येणाऱ्या नागरिकांचे समाधान करावे. समाधान शिबिराला लोकचळवळीचे स्वरुप आले आहे. अनेक नागरिक विविध योजनांची माहिती जाणून घेतांना व लाभ मिळण्यासाठी अर्ज भरतांना दिसत आहे. पालकमंत्री बडोले साहेबांच्या प्रयत्नांमुळे हे शिबीर होत आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिबीराला अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावपातळीवरील विविध यंत्रणांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध यंत्रणांच्या स्टॉलमधून लाभार्थ्यांना व नागरिकांना योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी अर्जाचे वाटप करण्यात आले.प्रास्ताविक तहसिलदार तथा उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी केले. संचालन प्रा.डॉ.दिलीप नाकाडे यांनी केले. आभार गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मानले.
०००००