एकोडी ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व अडचणित

0
10

गोंदिया – जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची तलवार लटकत आहे. जुलै २0१५ अंतर्गत घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर हे सदस्य निवडून आले आहेत.
१३ ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक २५ जुलै २0१५रोजी घेण्यात आली होती. परंतु राखीव जागेवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदारांकडे सादर करणे आवश्यक आहे.
परंतु येथील महादेव तेजराम बिसेन यांनी नायब तहसीलदारांना माहितीचा अधिकारांतर्गत ३१ मे रोजी अर्ज करून राखीव जागेवर निवडून आलेल्या व जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्यांची यादी मागितली. त्यामुळे विभागाकडून त्यांना ६ जून रोजी मागणीनुसार यादी देण्यात आली.
त्यानुसार येथील राखीव जागेतून निवडून आलेल्या सदस्यांमध्ये प्रभाग क्र.१ मधून गीता प्रकाश भलावी (अनु. जमाती महिला) व त्याच प्रभागातून माया मयाराम तायवाडे (अनु. जाती महिला), प्रभाग क्र.२ मधून चित्रकला तेसराम वघारे (नामाप्र महिला), प्रभाग क्र.३ मधील वैशाली विष्णुदयाल बिसेन (नामाप्र महिला) तर प्रभाग क्र. ५ मधून नामदेव मोहन बिसेन (नामाप्र) यांचा समावेश आहे.
नियमानुसार, निवडून आलेल्या सदस्यांना सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र या पाच सदस्यांनी विहीत कालावधीत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. परिणामी राज्य निवडणूक आयोगाच्या सक्त निर्देशामुळे येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व संकटात आले आहे.तर महादेब बिसेन यांनी अप्पर तहसीलदारांकडे (निवडणूक) या पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याकरिता कलम १0(१ अ) ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत अर्ज केला आहे.