महिलांनी लक्ष्मी मुक्तीसह विविध योजनांचा लाभ घ्यावा- उषा मेंढे

0
31

महिला सक्षमीकरण मेळावा
गोंदिया,दि.६ : महिलांच्या विकासाच्या व सक्षमीकरणाच्या दृष्टीने शासन विविध योजना राबवित आहे. महिलांनी लक्ष्मी मुक्ती योजनेसह विविध योजनांचा लाभ घेऊन कोणतीही महिला शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नये, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
तहसिल कार्यालय सालेकसाच्या वतीने महसूल आठवडा निमित्ताने साखरीटोला येथे ५ ऑगस्ट रोजी आयोजित महिला सक्षमीकरण मेळाव्यात उदघाटक म्हणून श्रीमती मेंढे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य लता दोनोडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून तहसिलदार प्रशांत सांगडे, पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सूनिल सोसे, माजी पं.स.सदस्य संगीता शहारे, तालुका कृषी अधिकारी श्री.तोडसाम, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शहारे, पोलीस निरिक्षक श्री.डोंगरे, साखरीटोला सरपंच संगीता कुसराम, माविमचे तालुका कार्यक्रम व्यवस्थापक अनिल गायकवाड यांची उपस्थिती होती.
श्रीमती मेंढे पुढे म्हणाल्या, महिला हया सक्षमच आहेत. परंतू महिलांना त्यांचे अधिकार माहीत असणे महत्वाचे आहे. महिलांनाही संपत्तीत पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार मिळायला पाहिजे. त्यांचा तो अधिकार आहे. बचतगटाच्या माध्यमातून विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा. संपूर्ण गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. ज्या महिलांकडे पैसे नसतील त्यांनी बचतगटातून कर्ज घ्यावे. सात-बारावर महिलांचीही नावे स्वहिस्सेदार म्हणून महिला सक्षमीकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने नोंदविली जावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
श्रीमती दोनोडे म्हणाल्या, महसूल विभागामार्फत विविध योजना महिलांच्या दृष्टीने राबविण्यात येतात. महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी महसूल आठवड्याच्या निमित्ताने प्रयत्न होत आहे. महिला सक्षमीकरण कार्यक्रम हा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
माविमचे श्री.सोसे म्हणाले, महिलांनी स्वत:चे व कुटुंबियांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न करावे. शौचालय बांधण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील महिलेने पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दारिद्रय रेषेखालील महिलांनी उज्वल योजनेचा लाभ घ्यावा. १४ ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामपंचायत स्तरावरील महिला सभेला जास्तीत संख्येने महिलांनी उपस्थित राहून रोजगारांच्या तसेच त्यांचाशी संबंधित असलेल्या अडीअडचणी मांडाव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पोलीस निरिक्षक डोंगरे यांनी सांगितले की, महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारात वाढ झाली आहे. महिलांनी निर्भिडपणे त्याला उत्तर दयावे. पोलीस विभागाची यासाठी मदत घेवून पोलीस विभाग सदैव महिलांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिली.
श्रीमती शहारे यांनी महिला बाल विकास विभागामार्फत महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. श्री.तोडसाम यांनी कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देतांना त्याचे निकष व अनुदानाबाबत विस्तृत सांगितले.
यावेळी लक्ष्मी मुक्ती योजनेचे १०० अर्ज उपस्थित महिलांना वाटप करण्यात आले. लावण्यात आलेल्या विविध योजनांच्या माहितीपर स्टॉलवरुन महिलांनी योजनांची माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समुह संघटक प्रशांत बारेवार, संयोगीनी उषा पटले, नैना कटरे, देवेंद्र शहारे यांच्यासह कारुटोला येथील पशुसखी, कृषीसखी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला कारुटोला क्षेत्रातील विविध गावातील २०० पेक्षा जास्त महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी केले. संचालन शिक्षिका साधना साखरे यांनी केले. उपस्थितांचे आभार सहयोगीनी उषा पटले यांनी मानले.