जिल्ह्यात 14 कोटी 25 लक्ष मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन

0
7

जिल्हा नील क्रांतीच्या दिशेने

गोंदिया,दि.8 : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियात पूर्वजांनी सिंचनासाठी माजी मालगुजारी तलाव बांधले. हे तलाव आजही सिंचनासोबत मत्स्य शेतीसाठी उपयुक्त ठरले आहे. जिल्ह्यातील ढिवर व आदिवासी बांधव मत्स्य सहकारी संस्थांच्या माध्यमातून या तलावात मत्स्यशेती करीत आहे. जिल्ह्यातील तलावातील गोड्या पाण्यातून कटला, रोहू, मृगळ आणि सायप्रिनस या जातींच्या माशांचे उत्पादन घेण्यात येत आहे. जिल्ह्यात इटियाडोह प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या मत्स्यबीज केंद्रातील चायनीज हॅचरीतून या हंगामात 1 कोटी 94 लक्ष तर जिल्ह्यातील जवळपास 11 मत्स्य सहकारी संस्थांच्या तलावातून 12 कोटी 31 लक्ष मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेण्यात आले. जिल्ह्याबाहेर व जिल्ह्यातील मत्स्य सहकारी संस्थांसोबतच खाजगीरित्या मत्स्य शेती करणाऱ्यांना इटियाडोह मत्स्यबीज केंद्र व मत्स्य सहकारी संस्थांकडून मत्स्यजीऱ्यांची विक्री करण्यात येत आहे. मत्स्यजीरे, मत्स्यबीज उत्पादन, बोटुकली ते मत्स्योत्पादनातून जिल्ह्याची निलक्रांतीकडे वाटचाल सुरु आहे.
जिल्ह्यात 133 मत्स्य सहकारी संस्थांची नोंदणी असून त्यापैकी 124 संस्था कार्यरत आहे. या संस्थांचे जवळपास 11 हजार सक्रीय सभासद मासेमारीचा व्यवसाय करीत आहे. ही मासेमारी पाटबंधारे विभागाच्या 65 आणि जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या 1087 तलावातून करण्यात येत असून यासाठी 11 हजार हेक्टर जलक्षेत्र उपलब्ध आहे.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव जवळील इटियाडोह मत्स्यबीज केंद्राची स्थापना 1975 मध्ये करण्यात आली व हे केंद्र 1978-79 मध्ये कार्यान्वीत झाले. या केंद्राचे एकूण क्षेत्र 12.95 हेक्टर इतके असून याचे जलक्षेत्र 4.82 हेक्टर आहे. यामध्ये संगोपन तळी 33, संवर्धन तळी 10 आणि संचयन तळी 4 अशी एकूण 47 तळी आहेत. येथील चायनीज हॅचरीतून मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेण्यात येते. या केंद्रातील शुध्द मत्स्यजीरे, मत्स्यबीजांची व बोटुकलींची विविध मत्स्य सहकारी संस्थांना विक्री करण्यात येते. 1 लाख मत्स्यजीऱ्याला 1500 रुपये शासन दराने विक्री करण्यात येते. इटियाडोह मत्स्यबीज केंद्रातून यावर्षी 1 कोटी 10 लक्ष मत्स्यजीऱ्यांची विक्री करुन या केंद्राला 1 लक्ष 72 हजार रुपये महसूल प्राप्त झाला आहे.
मत्स्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पथदर्शी प्रकल्प म्हणून 15 तलावात मत्स्यबीज संगोपन व संवर्धनासाठी तळी बनविण्यात येत आहे. या तळीचा उपयोग मत्स्यजीरे व मत्स्यबीज वाढविण्यासाठी होणार आहे. त्यामुळे या संस्थांच्या मत्स्य उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.