आर्थिक हितापोटी शिक्षण सभापती व शिक्षणाधिकार्याने लपवले प्रशाकीय मंजुरीचे पत्र

0
12

जि.प.सदस्य डोंगरे व पं.स.सभापती किंदरलेंचा आरोप

गोंदिया,दि.13 : तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रातर्तंगत येणारी तिरोडा येथील जिल्हा परिषद कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत कोसळण्यामागे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) व जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती जबाबदार असल्याचा आरोप जि.प. सदस्य व पदाधिकार्‍यांनी केला आहे. जीर्ण शाळा दुरूस्तीसाठी नऊ लाखांचा निधी डिसेंबर 2015 मध्ये मंजूर होऊनही त्या कामाची निविदा नऊ महिने लोटूनही न काढण्यामागे शिक्षण सभापती व शिक्षणाधिकारी यांचा आर्थिक स्वार्थ लपला होता असा आरोप जि.प.सदस्य डोंगरे यांनी केला आहे.या शाळा दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी डिसेंबर २0१५ मध्येच मिळाली होती. मात्र शिक्षण सभापतींनी ते पत्र दडवून ठेवले. वेळेवर ई-निविदा काढण्यात आली असती तर सदर इमारत क्षतिग्रस्त झालीच नसती.त्यामुळे या प्रकाराला सर्वस्वी बैयक्तिकरित्या शिक्षण सभापीत पी.जी.कटरे व शिक्षणाधिकारी उल्हास नरड हेच जबाबदार असल्याने यांच्यावर प्रशासकीय स्तरावर शासकीय इमारतीचे नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिरोडा प.स.सभापती उषा किंदरले,जि.प.सदस्य मनोज डोंगरे व इतरांनी केली आहे.

तिरोडा शहराच्या मध्यभागी असलेल्या जि.प. कन्या शाळेची इमारत ५ ऑगस्टच्या रात्री कोसळली. घटना दिवसा घडली असती तर जीवित हानीचा धोका होता. यावरून जि.प. शिक्षण विभाग व त्यावर नियंत्रण ठेवणार्‍या जि.प. पदाधिकार्‍यांना विद्यार्थी व पालकांची किती काळजी आहे, हे स्पष्ट होते.सदर शालेय इमारतीला जि.प. सदस्य मनोज डोंगरे, पं.स. सभापती उषा किंदरले, खंडविकास अधिकारी हिरामन मानकर, गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे, अभियंता पी.एम. दमाहे, पी.व्ही. टेंभुर्णीकर, मुख्याध्यापक एन.एस. रहांगडाले, शिक्षण विस्तार अधिकारी पिंटू समरीत व पी.ए. खोब्रागडे यांनी गुरूवार (दि.१0) भेट देवून निरीक्षण केले.
यावेळी किंदरले व मनोज डोंगरे यांनी इमारतीच्या दुर्घटनेसाठी जि.प. शिक्षण विभाग व शिक्षण सभापतीला जबाबदार धरले. सदर प्रकरणाची समितीद्वारे चौकशी करून कारवाई करावी व क्षतिग्रस्त इमारतीची संपूर्ण रक्कम शिक्षण विभाग व शिक्षण सभापती यांच्याकडून वैयक्तिकरित्या वसूल करण्यात यावी, अशी मागणी केली.

डोंगरे यांनी सांगितले की, शिक्षण समिती सभा, जि.प. गोंदिया ठराव क्र.९ दिनांक १९ ऑक्टोबर २0१५ नुसार, सदर इमारतीच्या दुरूस्तीसाठी ९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाला (जा.क्र./ जिपगो/ सशिअ/ बांध/५७१/२0१५) कार्यालय सर्व शिक्षा अभियान, जि.प. गोंदिया दि.२६ नोव्हेंबर २0१५ ने ३१ जानेवारी २0१३ चे परिशिष्ट २ भाग १(१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मंजूर झालेल्या कामाला शिक्षणाधिकारी (प्राथ) उल्हास नरड यांनी मान्यता प्रदान केल्याचे पत्र दिले होते.
कामाला प्रशासकीय मंजुरी दिल्याचे पत्र काढल्यानंतर नियमानुसार ई-निविदा काढणे गरजेचे होते. परंतु शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांनी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या माध्यमाने सदर पत्र दडवून ठेवले. त्यामुळे ई-निविदा निघू शकली नाही व आठ महिन्यापूर्वीचे मंजूर काम रखडले. शेवटी इमारत कोसळली व शासनावर लाखो रूपयांचा भुर्दंड बसला.
कन्या शाळा ही कवलेवाडा क्षेत्रात येत असून शाळेचे प्रतिनिधित्व आपल्याकडून जि.प.ने हिसकावले, ही दुर्दैवी बाब आहे.जि.प. सभापती कटरे यांनी वैयक्तिक लाभापोटी आपल्याकडून या शाळेचे सभापतीपद का काढले, हे आता स्पष्ट झाले आहे. आपण सभापती असतो तर कदाचित असे घडू दिले नसते.आणि बांधकाम वेळेवर झाले असते परंतु शिक्षणाधिकारी व शिक्षण सभापतीला या बांधाकमात आर्थिक लाभ घ्यावयाचे असल्यानेच त्यांनी आपणास या शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या सभापतीपदावरुन काढल्याचे आरापे डोंगरे यांनी केला.