शासनाच्या सुविधांचा लाभ सामान्यांनी घेणे गरजेचे

0
6

गोंदिया,दि.13 : अदानी फाऊंडेशन तिरोडाद्वारे बुधवारला अदानी वीज प्रकल्प तिरोडाच्या आवारामध्ये सुपोषण शाश्‍वत आरोग्य व पोषाहार सहायता कार्यक्रमाचे उद््घाटन मोठय़ा उत्साहा झाले. अदानी फाऊंडेशनच्या वतीने ४८ गावांमध्ये कुपोषण व रक्ताक्षय निर्मूलन कार्यक्रम राबवित असून त्याकरिता ३४ महिलांची गावागावातून निवड करण्यात आली. त्या महिला गावपातळीवर महिला व मुलांसोबत कार्य करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प प्रमुख सी.पी. साहू, तर उद्घाटक म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी. निमगडे तर प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना साहू म्हणाले, कोणत्याही कार्यात यशस्वी होण्याकरिता सगळ्यांची गरज असते. आजच्या या कार्यक्रमात सर्व शासकीय विभागाकडून मिळालेला मदतीचा हात यामुळे अदानी फाऊंडेशनला तालुका कुपोषणमुक्त करण्यास मोलाचे सहकार्य मिळणार आहे.
डॉ.निमगडे आपल्या भाषणात म्हणाले, अदानी फाऊंडेशनद्वारा ‘सुपोषण’ कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. आरोग्याच्या बाबतीत हा उत्तम कार्यक्रम असून त्यांनी खूप मोलाचे पाऊल उचलले आहे. याकरिता त्यांना धैर्याची गरज आहे. तसेच शासन आणि अदानी फाऊंडेशन दोन्ही मिळून हे कार्य केल्यामुळे तालुक्यातील कुपोषण निर्मूलन होण्यास वेळ लागणार नसल्याचे सांगून याकरिता वेळोवेळी सहायता करू असे ते म्हणाले.
निवासी उपजिल्हाधिकारी महिरे यांनी आपल्या मार्गदर्शनात गोंदिया जिल्हा वृक्षसंपदा, सुपीक शेती, पावसाचा व तलावांचा जिल्हा आहे. परंतु महाराष्ट्रात मागासलेला आहे. शासन यंत्रणेतर्फे बालकांकरिता लसीकरण व अन्य सुविधा चांगल्या आहेत. परंतु लोक त्याचा पुरेपुर लाभ घेत नसल्याचे दु:ख व्यक्त करीत त्याचा पुरेपूर लाभ घेण्यास सांगितले.
तहसीलदार रविंद्र चव्हाण यांनी सुपोषण या शब्दात भावार्थ लपला असून गर्भधारणेपासून सुपोषित आहार जर मातेला पुरविला तर कुपोषित बालक दिसणार नसल्याचे सांगितले. जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी जे.एम.अंबादे यांनी अंगणवाडीमध्ये जो सकस आहार गावातील महिला व बालकांना दिला जातो तो आहार जनावरांना न देता स्वत: त्याचा लाभ घ्यावा असे सांगून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.चव्हाण, गटविकास अधिकारी एच.एस. मानकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.टेंभुर्णीकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.हिम्मत मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात महिला बालकल्याण अधिकारी बोधले, परिवर्तन संघाचे शुद्धोधन सहारे, डॉ.परना बारडोलाई, डॉ. सचिन, डॉ.ताजने, डॉ.ए.एन. त्रिपाठी, पोषाहार पुनर्वसन केंद्र गोंदिया व उपजिल्हा रुग्णालय तिरोडाच्या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. यावेळी डॉक्टर्स व नर्सेस, गावातील लोक प्रतिनिधी उपस्थित होते.