राज्यात स्वातंत्र्यदिनी होणार 44 सायबर लॅबचे उदघाटन

0
12

गोंदिया,दि.13- महाराष्ट्र पोलिस दलातर्फे राज्यातील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संपूर्ण राज्यात एकाच वेळी ४४ सायबर लॅब १५ ऑगस्ट रोजी सुरु करण्यात येत आहे.गोंदिया येथे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक कार्यालयात हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली आहे.तर शेजारील गडचिरोली येथे पोलिस अधीक्षक कार्यालयात पालकमंत्री अंब्रीशराजे आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर हे उद्घाटन होईल. या कार्यक्रमास खासदार अशोक नेते, आमदार मितेश भांगडिया, ना.गो. गाणार, डॉ. देवराव होळी , कृष्णा गजबे तसेच जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांची प्रमुख उपस्थिती असेल.
याबाबत माहिती देताना गडचिरोली पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले की, अधीक्षक कार्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही सुसज्ज अशी सायबर लॅब तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी ७ संगणकाची व्यवस्था राहणार आहे. लॅबसाठी एक अधिकारी व संगणकनिहाय कर्मचारी असे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
गेल्या काही दिवसात इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. तसेच व्हॉटस्अप, फेसबूक व इतर समाज माध्यमांचा गैरवापर देखील होताना दिसते. या सर्व गुन्हयांचा तपास व सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या लॅबचा पोलिस दलाला उपयोग होणार आहे.या उद्घाटन समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोंदिया व गडचिरोलीचे पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.