अ‍ॅट्रासिटी प्रकरणातून जि.प.चे तत्कालीन १० पदाधिकाऱ्यांची निर्दोष सुटका

0
16

तत्कालीन सीईओ डॉ.यशवंत गेडाम मारहाण प्रकरण

गोंदिया, ता. २५ : जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत गेडाम यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन १० पदाधिकाऱ्यांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात चालले. अखेर आज, गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. त्रिवेदी यांनी दहाही पदाधिकाऱ्यांची अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेतराम कटरे, विनोद अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विद्यमान आमदार विजय रहांगडाले, गोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. किशोर गौतम, जिल्हा परिषदेचे माजी सभापती पंचम बिसेन, माजी जिल्हा परिषद सदस्य मदन पटले, माजी नगरसेवक संजय कुलकर्णी, बरकत अली सय्यद, माजी जिल्हा परिषद सदस्य मोरेश्वर कटरे व माजी सभापती श्रावण राणा आदी पदाधिकारी २०१२ मध्ये जिल्हा परिषदेत सत्तारूढ होते. १३ डिसेंबर २०१२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत गेडाम यांच्या दालनात जाऊन या दहाही पदाधिकाऱ्यांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली. एवढेच नाही तर, धक्काबुक्की करून मारहाण केली, अशी तक्रार गेडाम यांनी पोलिसात केली. पोलिसांनी आरोपींविरूद्ध अनुसूचित जाती- जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण येथील जिल्हा सत्र न्यायालयात चालले. न्यायालयाने आज, गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी घेतली. जिल्हा सत्र न्यायाधीश त्रिवेदी यांनी दोन्ही पक्षांची बाजू समजून घेत अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून तत्कालीन दहाही पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे अ‍ॅड. डोये यांनी तर, आरोपींतर्फे अ‍ॅड. टी. बी. कटरे, अ‍ॅड. कांतिलाल अग्रवाल, अ‍ॅड. निजा‘ शेख यांनी बाजू मांडली. उल्लेखनीय म्हणजे, या पदाधिकाऱ्यांनी गेडाम यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.