१६ गावांतील शेतकर्‍यांची लूट थांबवा -अशोक लंजे

0
7

१६ गावांतील शेतकर्‍यांची लूट थांबवा -अशोक लंजे
गोंदिया,दि.09 : केंद्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र हंगाम २0१६-१७ करीता सडक अर्जुनी तालुक्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत सौंदड, बाम्हणी, हेटी, मुरपार, धानोरी, पांढरी येथे तसेच उपप्रादेशिक कार्यालय आदिवासी विभाग नवेगावबांध यांच्या सेवा सहकारी आदिवासी संस्थांमार्फत कनेरी, चिखली, कोहमारा, सडक अर्जुनी, परसोडी, डव्वा, खजरी, दल्ली, डोंगरगाव, कोयलारी या केंद्रावर शासनाच्या आधारभूत धान धरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र या केंद्रांवर शेतकर्‍यांसाठी योग्य सुविधा नाही. त्या सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांची लूट थांबवावी अशी मागणी जि.प.चे माजी कृषी सभापती अशोक लंजे यांनी केली आहे.
या धान्य खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांकडून धान्य खरेदी करताना ईलेक्ट्रानिक वजन काटे उपयोगात आणायला हवे, परंतु जुने साधे काटे (वजन माप) नुतनीकरण न करताच सर्रासपणे शेतकर्‍यांचे धान जास्त प्रमाणात मोजल्या जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शासन दरापेक्षा कमी दराने धान्य शेतकर्‍याने व्यापार्‍यास विकू नये याची खबरदारी घेणे बाजार समितीची आहे. परंतु सर्रासपणे सडक अर्जुनी तालुक्यात व्यापारी शेतकर्‍यांकडून शासनाच्या सर्मथन मुल्यापेक्षा कमीदराने खर्‍यावरच धान्य खरेदी करीत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील जिल्हा मार्केटिंग गोंदिया व आदिवासी विभाग नवेगावबांध यांच्यामार्फत चालविण्यात येणार्‍या धान्य केंद्रावर धान्य खरेदीवर शासनाचा ग्रेडर दिसून येत नाही. या केंद्राच्या माध्यमातून बाजार समितीला १ रु.५पैसे शेष रुपाने मिळते.
जवळपास सडक अर्जुनी बाजार समितीला वर्षापोटी २५लाख पर्यंत उत्पन्न होते. परंतु या शेषच्या उत्पन्नातून प्रत्येक केंद्रावर बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी बसण्याची व्यवस्था, टोकण देणे, शेड, आद्रतामापक यंत्र, माहिती फलक, पिण्याचे पाणी व केंद्राशी जोडलेले गाव यादी, इत्यादी व्यवस्था करुन देणे शासन निर्णयानुसार करुन देणे बंधनकारक आहे. बहुतांश केंद्रावर ही सुविधा दिसून येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकर्‍याकरिता सुख-सुविधेचा अभाव असून शेतकरी हवालदिल झाला आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे माजी सभापती अशोक लंजे यांनी म्हटले आहे