सोशल मिडियावर सायबर सेलची नजर; भरारी पथकाची नेमणूक

0
9

कायदा व सुव्यवस्था पाळा
आचार संहितेचे काटेकोर पालन करा
भंडारा, दि. 9:-  डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या भंडारा तुमसर, पवनी व
साकोली नगर परिषदेच्या निवडणूकीत उमेदवारांना लागणाऱ्या सर्व
परवानग्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी   डॉ.
अभिजीत चौधरी यांनी  नगरपरिषद निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या.
नगर परिषद निवडणूकीसंबंधी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक
घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, सर्व
उपविभागीय अधिकारी , सर्व नगर पालिका मुख्याधिकारी व विविध विभागाचे
अधिकारी यावेळी उपस्थित होते.
नगर परिषद निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूका करण्यात
आल्या असून भंडारा- उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तुमसर उपविभागीय
अधिकारी शिल्पा सोनाले, पवनी- उपजिल्हाधिकारी जी.जी. जोशी व साकोली
उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले याचा समावेश आहे. तर सहाय्यक निवडणूक
अधिकारी म्हणून त्या-त्या नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांची नेमणूक
करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी
एस.एस. अहिरे यांची तर भंडारा- तुमसर येथील निवडणूक निरिक्षक म्हणून
अतिरिक्त जिल्हाधिकारी  डॉ. प्रदीपकुमार डांगे आणि  साकोली व पवनी येथील
निवडणूक निरिक्षक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांना
जबाबदारी देण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदार याद्या काळजीपूर्वक तपासून प्रसिध्द
कराव्या. मतदान केंद्र शासकीय इमारतीत स्थापन करावे. मतदान केंद्रात सर्व
सुविद्या उपलब्ध असतील याची दक्षता घ्यावी. मतदानाचे प्रशिक्षण तात्काळ
आयोजित करावे. तसेच मतदारांमध्ये जागृती करावी, अशा सूचना
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात. महत्वाचे म्हणजे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी
सहाय्यता कक्ष स्थापन करुन त्यासाठी इच्छुकांना सहकार्य करण्यात यावे.
उमेदवारी अर्जासोबत लागणारे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे उमेदवारास
बंधनकारक आहे असे असले तरी ज्या उमेदवाराने जात पडताळणी समितीकडे अर्ज
सादर केला आहे. त्या अर्जाची पोच अर्जासोबत असल्यास अर्ज भरुन घेण्यात
यावा. निवडणूकीचा  प्रशासकीय खर्च  नगर पालिकेच्या निधीतून करण्यात यावा.
पुरेसा निधी उपलब्ध नसल्यास तात्काळ त्या संबंधी उपाय योजना कराव्यात,
असेही त्यांनी सांगितले. मतदार चिठ्ठया शंभर टक्के वितरित होतील याची
दक्षता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
निवडणूकीदरम्यान  कायदा व सुव्यवस्था चोख पाळण्यात यावी. नगर पालिका
क्षेत्रातील परवानाधारक शस्त्र जमा करुन घ्यावे. आर्थिक बळाचा दुरुपयोग
होणार नाही. तसेच रोख व्यवहार होणाऱ्या संस्था व ठिकाणावर नजर ठेवावी.
सोशल मिडिया व पेंड न्युज यावर लक्ष ठेवण्यात यावे. दारुचा नियमित साठा
दर दिवशी तपासण्यात यावा व त्याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना
देण्यात यावा. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर तक्रार निवारण
कक्ष स्थापन करुन त्याचा हेल्प लाईन क्रमांक प्रसिध्द करावा. भरारी
पथकाची स्थापना करण्यात यावी. तसेच  चेक पोस्ट व चेक नाके याठिकाणी पोलीस
बंदोबस्त  तैनात करावा व एसएसटी टिची स्थापना करावी. निवडणूक निर्भय व
निपक्ष वातावरणात होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न  करण्याच्या सूचना
त्यांनी दिल्या.