रामभाऊंचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी

0
11

भंडारा,दि.20 : ज्या काळात रामभाऊ भारतीय जनता पक्षाशी जुळले तो प्रतिकुल काळ होता. त्या परिस्थितीत रामभाऊ समाजातील वंचितांसाठी धडपडत राहिले. मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतानाच पक्षाचे संघटन वाढविले. आजारपणाच्या काळात मनाने स्वस्थ वाटत असले तरी आजाराने त्यांचा पिच्छा सोडला नाही, त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले, अशा शब्दात केंद्रीय भूतल परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रामभाऊंना श्रद्धांजली वाहिली.

माजी आमदार स्व.राम आस्वले यांच्या स्मृतिनिमित्त भाजपच्यावतीने आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले,माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे, जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी, आ.रामचंद्र अवसरे, उपस्थित होते.

रामभाऊंच्या आठवणींना उजाळा देताना ना.गडकरी म्हणाले, १९७० च्या दशकात रामभाऊ पुण्यात शिकत असताना अभाविपशी जुळले. त्यावेळी ते गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आले. शिक्षण पूर्ण करून रामभाऊ भंडाऱ्यात आले. आणि भाजपच्या संघटनवाढीसाठी त्यांनी जीव ओतून काम केले. १९९५ मध्ये आम्ही दोघे आमदार म्हणून सोबत होतो. मित्र म्हणून माझा त्यांच्याशी व कुटूंबीयांशी जवळचा संबंध होता. १० वर्षापूर्वी रामभाऊ आजारी पडले. जेव्हाजेव्हा मी भंडाऱ्यात येत होतो, त्या प्रत्येकवेळी रामभाऊंना आवर्जून भेटायचो. त्यांची प्रकृती सुधारेल यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांशी भेटी घेतल्या, परंतु आजारावर उपाय मिळू शकला नाही. रामभाऊ आज आपल्यात नाही, याचे अतिव दु:ख आहे. परंतु नवीन कार्यकर्त्यांनी रामभाऊंचे संघटन कौशल्य नजरेसमोर ठेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न झटले पाहिजे. रामभाऊंनी जी प्रतिकुल परिस्थिती बघितली तशी स्थिती आज नाही. कार्यकर्त्यांनी राष्ट्रनिर्माणाचे स्वप्न बाळगून जनसामान्यांची नाळ ज़ुळवून ठेवली पाहिजे. यानिमित्ताने आपण नवनिर्माणाचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला तर खऱ्या अर्थाने रामभाऊंना श्रद्धांजली ठरेल, असे शब्दात श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी शहर अध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, भाजपचे सुनिल मेंढे, संजय कुंभलकर, बाबू ठवकर, आबिद सिद्धीकी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व रामभाऊंवर प्रेम करणारा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.