इटियाडोह कर्मचारी वसाहत जीर्णावस्थेत

0
14

देसाईगंज दि.२1: देसाईगंज-आरमोरी राज्य महामार्गाच्या बाजुला सुमारे चार एकर जागेत इटियाडोह प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाच्या मागच्या बाजुस कर्मचाऱ्यांची निवास्थाने आहेत. या निवासस्थानांची दूरवस्था झाली आहे.या ठिकाणी माहिती घेण्यासाठी एखादा शेतकरी गेल्यास एकही कर्मचारी उपस्थित राहत नाही. केवळ सह्या मारून वेतन उचलण्याचेच काम येथील कर्मचारी करीत असल्याचे दिसून येत आहे.

इटियाडोह कालवे निर्मितीच्या कालावधीत उपविभागीय कार्यालय परिसरात कामगार, कर्मचारी, अधिकारी यांची नेहमीच धावपळ दिसून येत होती. या ठिकाणी दोन कार्यालये, एक विश्रामगृह व एक उपविभागीय अभियंता निवासस्थान आहे. त्याचबरोबर मागील बाजूस कर्मचाऱ्यांची वसाहत होती. इटियाडोह कार्यालयाची इमारत व कर्मचारी वसाहत सुमारे चार एकरच्या परिसरात वसली आहे. इटियाडोह निर्मितीच्या कालावधीत या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर अनेक जबाबदाऱ्या असल्याने कर्मचारी निवासस्थान, अधिकारी निवासस्थान व विश्रामगृहाचीही निर्मिती करण्यात आली. मात्र मागील पाच वर्षांपासून पाणी व्यवस्थापनाचे काम गावपातळीवरील समित्यांकडे देण्यात आले आहे. कामाचेही सरळ कंत्राटच दिल्या जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या संपुष्टात आल्या. परिणामी या विभागात मागील अनेक वर्षांपासून पदभरतीच झाली नाही. कार्यालय तीन व कर्मचारी चार अशी परिस्थिती या ठिकाणची आहे.