तिरोडा मतदारसंघाच्या समस्या मांडणार विधिमंडळात-आ.रहागंडाले

0
7

गोंदिया,दि.06- : गेल्या दोन वर्षापासून तिरोडा विधानसभा क्षेत्रात विकासाचा वेग वाढला आहे. सिंचन क्षेत्रात विकास होत असून सिंचन क्षेत्रातील काही समस्या अजूनही कायम आहेत. या समस्या विधानसभेत मांडणार असून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. विजय रहांगडाले यांनी कळविले आहे.

जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येण्याकरिता या समस्या दूर करण्याची आवश्यकता आहे. धापेवाडा उपसा सिंचनचे पाणी खळबंदा तलावात सोडणे, धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र.२ पाईपलाईन बोदलकसा व चोरखमारा तलावात मंजूर असून निधी मागणी, निमगाव लघूसिंचन प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी यासंबंधी मुद्दे सोडविण्यात आपला भर राहणार आहे. धानाला खर्चाऐवढा हमीभाव मिळवून देण्याकरिता सतत प्रयत्नशील आहे. रस्त्याच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा निघणार यासाठी अधिवेशन काळात पूर्ण प्रयत्न राहणार आहेत.

धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्र.१ चे काम पूर्ण होत आले असून खळबंदा तलावात पाणी सुटणार आहे. परंतु चोरखमारा, बोदलकसा, खळबंदा, रिसाळा, संग्रामपूर या तलावांच्या खोलीकरण व नहर दुरुस्तीचे काम अद्यापही झाले नाही. त्याकरिता तारांकित प्रश्न व लक्षवेदीच्या माध्यमाने दुरुस्ती व्हावी याकरिता विशेष प्रयत्न सुरू आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे निमगाव लघूसिंचन प्रकल्प अनेक वर्षापासून रखडलेला आहे हा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे.

गोंदिया जिल्ह्यातील जि.प. शाळेतील (शिक्षण विभाग) जीर्ण इमारती, तिरोडा पोलीस स्टेशनची जीर्ण इमारत याकरिता शासनाकडून (गृहविभाग) विशेष निधी मंजूर करुन अद्यावत ईमारती तयार करणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रातील खासगी किंवा सरकारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाची ओढ लागावी याकरिता उद्योग क्षेत्रासोबत हवा तसा समन्वय असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये कुठेतरी माघार घेताना दिसून येत आहेत किंवा शिक्षणासाठी पुणे-मुंबईकडे जातात. पदविस्तरावर विद्यार्थ्यांचे उद्योग क्षेत्राला अनुसरुन पुरक असे कौशल्य विकसित करण्याकरिता सर्व पातळीवर प्रयत्न करणे सुरू आहेत.

अंशकालीन पदवीधरांचा अजुनची कायम आहे या अंशकालीन कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गरीब नागरिक उपचाराकरिता येतात. येथील समस्या कायमस्वरुपी दूर करण्यासाठी जेनेरिक औषधीची दुकाने जास्त प्रमाणात उघडण्याकरिता आवश्यक प्रयत्न करणे सुरू आहेत, असे कळविण्यात आले आहे