गोंडपिपरीत ओबीसीच्या आंदोलनाची जय्यत तयारी

0
6

गोंडपिपरी : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नागपूर येथील विधानभवनावर लाखोंच्या संख्येनी ८ डिसेंबरला ओबीसी बांधव धडकणार आहेत. ओबीसी समाजाच्या या महामोर्चाला यशस्वी करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. गोंडपिपरी तालुक्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुख्य संयोेजक डॉ.अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात मोर्चाचे नियोजन सुरू असून गावागावात बैठकांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तालुक्यात समन्वय समितीने आंदोलनाची तयारी चालविली आहे व ती आता अंतिम टप्प्यात पोहचली असल्याची माहिती गोंडपिपरीत मंगळवारला आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आली.

ओबीसी वर्गासाठी स्वतंत्र मंत्रालय व जातीनिहाय जनगणना व्हावी, नियुक्ती व बढतीमध्ये आरक्षण मिळावे, शिक्षणात १०० टक्के शिष्यवृत्ती व फ्रिशिपची योजना लागू व्हावी, मंडळ, नच्चीपन व स्वाभिमान आयोगाच्या शिफारसी लागू व्हावी, क्रिमिलिअरची अट रद्द करावी, यासह आपल्या एकूण १९ मागण्यांच्या परिपूर्ततेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजता नागपूर येथील विधानभवनावर धडक देणार आहे. सदर मोर्चाच्या यशस्वीतेसाठी गोंडपिपरी तालुक्यात तालुका ओबीसी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. समन्वय समितीच्या माध्यमातून ओबीसी बांधवांमध्ये जनजागृती सुरू आहे. यासाठी तालुक्यातील गावागावात बैठकांचे आयोजन करण्यात आले. आठवडाभरापासून ही समिती कार्यान्वित असून समितीच्या वतीने डॉ.अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात समाज बांधवांची चर्चात्मक बैठक नुकतीच पार पडली. यात समाजाच्या पॅनलची स्थापना करण्यात आली. पॅनलच्यावतीने तालुकाभर बांधवांना एकजुट करण्याचे कार्य सुरू आहे. दरम्यान आज गोंडपिपरीत मोर्चाचा आयोजनासंदर्भात पत्रपरिषद झाली. यावेळी मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले. मोर्चाबद्दल जनजागृती करण्यासाठी बुधवारी शहरातील मुख्य मार्गाने भव्य रॅली काढण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रपरिषदेत प्रा. येलेकर, सुरेश चौधरी, देविदास सातपूते, अशोक रेचनकर, यांनी दिली