ग्राहकांसाठी महावितरणची ‘नवप्रकाश’ योजना

0
12

गोंदिया,दि.13-थकित देयकांमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणची नवप्रकाश योजना १ नोव्हेंबर २0१६ पासून सुरू झाली आहे. या योजनेत कृषीपंपधारक व सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना वगळता उर्वरित सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांचा समावेश आहे. नवप्रकाश योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणार्‍या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली असून ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञापत्राची गरज लागणार नाही. शिवाय वीजजोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नवप्रकाश योजनेचा कालावधी ६ महिन्यांचा असून नवप्रकाश योजनेच्या पहिल्या ३ महिन्यांत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची रक्कम १00 टक्के माफ होणार आहे. तर योजनेच्या पुढील ३ महिन्यांत व ६ महिन्यांपर्यंत मूळ थकबाकी आणि २५ टक्के व्याजाच्या रक्कम भरणा केल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १00 टक्के रक्कम माफ होणार आहे.
ज्या कायमस्वरुपी वीजपुरवठा थकबाकीदार ग्राहकांना या योजनेत सहभाग घ्यावयाचा असेल त्यांना भरणा करावयाच्या रक्कमेचा तपशील सहजरित्या माहिती व्हावा म्हणून महावितरणच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून दिली आहे. तसेच जेथे इंटरनेटची सुविधा नसेल अशा ग्राहकांना त्यांच्या थकबाकीच्या रक्कमेचा तपशील महावितरणच्या शाखा कार्यालयापासून ते मंडल कार्यालयात तातडीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच याकरिता संबंधित कार्यालयात एका कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेतून थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना महावितरणकडून उद्योग चालू करण्याच्या प्रोत्साहांतर्गत त्यांच्या मागणीनुसार त्वरीत नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे. सदर जोडणीसाठी ग्राहकांवर पडणारा आर्थिक भार कमी करून उद्योग पूर्ववत चालू करावेत या उद्देशाने या ग्राहकांकडून सुरक्षा ठेव, सव्र्हीस कनेक्शन चार्जेस रिकनेक्शन चार्जेसमध्ये विशेष सूट देण्यात आली आहे.
महावितरणच्या या नवप्रकाश योजनेत लोक अदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांनाही सहभागी होता येणार आहे. परंतु, या ग्राहकास न्यायालयीन प्रकरणासाठी महावितरणतर्फे करण्यात आलेला खर्च नवप्रकाश योजनेनुसार देय असलेल्या थकबाकीसोबत भरावा लागेल. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांनी या नवप्रकाश योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे