घोट येथील अगरबत्‍ती प्रकल्‍प पथदर्शी प्रकल्‍प ठरावा – ना. सुधीर मुनगंटीवार

0
9

गडचिरोली,दि.१३:वनउपजाच्‍या माध्‍यमातुन आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने राऊंड अगरबत्‍ती स्‍टीक प्रकल्‍पासारखे उपक्रम राबविणे अतिशय गरजेचे आहे. हा अगरबत्‍ती प्रकल्‍प संपूर्ण राज्‍यासाठी पथदर्शी प्रकल्‍प ठरावा अशी अपेक्षा राज्‍याचे वित्‍त, नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली.
13 डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्‍हयातील आलापल्‍ली वनविभागांतर्गत घोट वनपरिक्षेत्रात बांबु प्रक्रिया केंद्रांतर्गत राऊंड अगरबत्‍ती स्‍टीक प्रकल्‍पाच्‍या उदघाटन सोहळयात वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. वनविभाग हा रोजगार निर्मीतीच्‍या दृष्‍टीने अतिशय महत्‍वाचा विभाग असुन चंद्रपूर जिल्‍हयातील चिचपल्‍ली येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्‍थापन करण्‍याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. विविध रोजगारक्षम उपक्रम राबवून वनविभाग नागरिकांना त्‍यांच्‍या जवळचा विभाग वाटावा यादृष्‍टीने आपण अनेक महत्‍वपूर्ण निर्णय घेतल्‍याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

यावेळी ‘‘शेकरू’’ या पुस्तिकेचे विमोचन वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी गडचिरोली जिल्‍हयाचे पालकमंत्री राजे अंब्ररीशराव आत्राम, खा. अशोक नेते. आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्‍णा गजबे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते कोणशिला अनावरण व अगरबत्‍ती प्रकल्‍पाचे उदघाटन करण्‍यात आले. यावेळी ना. मुनगंटीवार आणि मान्‍यवरांनी वनउद्यानाची पाहणी केली.