कर्मचा-यांना त्रास देणा-या अधिका-यांना निलंबित करू

0
12

नागपूर, दि. 14 – सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यातील भटक्या विमुक्त जमातींच्या मुला-मुलींसाठी आश्रमशाळा चालवल्या जातात. समाज कल्याण विभागाचे अधिकारी या शाळेतील शिक्षकांचे वेळेवर वेतन करीत नाहीत. तसेच त्यांचे वेतन भत्ते लवकर देत नाहीत अशा तक्रारी येतात.

कर्मचाऱ्यांना जाणुनबुजून तत्रास देणाऱ्या समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्याची तक्रार मिळाल्यास त्याला त्वरित निलंबित केले जाईल असे आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत दिले. दत्तात्रय सावंत व श्रीकांत देशपांडे यांनी आश्रमशाळेतील थकीत वेतनासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. याला उत्तर देताना ते बोलत होते.

दत्तात्रय सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यातील समाज कल्याण अधिकाऱ्याच्या गैरवर्तनासंदर्भात नेमका प्रश्न उपस्थित केला होता. शासनाने १७ आॅक्टोबर २०१६ रोजी शिक्षकांचे पगार करण्याचे आदेश दिले होते. तसेच निधीदेखील उपलब्ध होता परंतु, संबंधित अधिकाऱ्याने त्याकडे कानाडोळा करून हा निधी इतरत्र वळता केला. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधीने संबंधित अधिकाऱ्याला सांगून देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधी बाकांवरून करण्यात आला.

त्यावर बोलताना राजकुमार बडोले यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांनी यासंदर्भातील प्रलंबित याचिकांवर सुनावणी करताना कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या ५० टक्के थकीत रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे सोलापुरातील निधी इतरत्र वळता करण्यात आला. याप्रकरणात संबंधित सहायक आयुक्तांची चौकशी केली जाईल असे बडोले यांनी स्पष्ट केले.