दोन्ही काँग्रेसने शहराचे वाटोळे केले : ना. बडोले

0
11

भाजपा प्रचार सभेत ना. बडोले यांचे प्रतिपादन
गोंदिया ,दि.05:गोंदिया नगर परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधीक काळ सत्तेत राहिले आहे. परंतु आजही शहराचा विकास खुंटला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असुनही शहरातील रस्ते व दुर्गंधी बघितल्यास शहराच्या विकासाची कल्पना करता येईल. गेल्या अनेक दशकापासून या दोन्ही काँग्रेसने केवळ सत्ताच उपभोगली. परंतु शहराचा विकास शुन्यच राहिला. मात्र गत अडीच वर्षाचा भाजपाच्या काळात विकासाच्या अनेक योजनांना शहरात मंजुरी मिळाली असून भविष्यात त्या पूर्णत्वास जाणार आहेत. दोन्ही काँग्रेसने शहराचे वाटोळे केल्याचा आरोप ना. राजकुमार बडोले यांनी केला.
ते काल ४ जानेवारी रोजी गोंदिया येथील नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपाचे नगराध्यक्षाचे उमेदवार अशोक इंगळे व नगरसेवकांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, शहर अध्यक्ष सुनील केलनका, भाजपाचे जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख जयंत शुल्का, नगराध्यक्षाचे उमेदवार अशोक इंगळे यांच्यासह नगरसेवकचे उमेदवार व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना ना. बडोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची भूमिका नेहमी विकासाची राहिली आहे. घराने शाहीचे राजकारण भाजपा करत नसल्याने आज माझ्या सारख्या सामान्य माणूस राज्याच्या कॅबिनेट मध्ये मंत्री म्हणून आहे. मात्र गोंदिया शहर काँग्रेस व राष्ट्रवादीचे राजकारण हे दोन घरांपुरतीच मर्यादीत आहे. अनेक वर्ष नगर परिषदच्या सत्तेत राहुनही शहराचा विकासापेक्षा स्वतःचा विकास या पक्षांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेने विकासाला मत दिली होती व भाजपाचे ध्येय केवळ सर्वसामान्यांचा विकास हेच आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या विकासाची गंगा शहरापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.