जेथे माणसापेक्षा दगडाला जास्त किंमत, तो देश मोठा कसा होणार?-ज्ञानेश महाराव

0
55

गडचिरोली, दि.१३: देशातील बहुजन समाज बुद्धीचा वापर न करता भावनेच्या आहारी जात असल्याने मातीचे गोळे डोक्यावर घेऊन बुडविले जातात. ज्या देशात माणसापेक्षा दगडाला जास्त किंमत असते, तो देश मोठा कसा होणार? असा परखड सवाल ‘चित्रलेखा’चे संपादक आणि फर्डे वक्ते ज्ञानेश महाराव यांनी उपस्थित केला.
शिक्षणमहर्षी गो.ना.मुनघाटे यांच्या जयंतीनिमित्त ‘कमल-गोविंद’ प्रतिष्ठानच्या वतीने स्थानिक विद्याभारती कन्या विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ‘उठावा महाराष्ट्र देश’ या विषयावर व्याख्यान देताना श्री.महाराव बोलत होते. काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते आ.विजय वडेट्टीवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रतिष्ठानचे सदस्य अनिल मुनघाटे, सुप्रसिद्ध समीक्षक प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे, प्राचार्य भैयासाहेब ठाकरे, कल्पना मुनघाटे उपस्थित होते.
ज्ञानेश महाराव यांनी आपल्या भाषणात बुवाबाजी, कर्मकांड आणि जातियवाद्यांवर घणाघाती प्रहार केले. ते म्हणाले, दीड दिवसांची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊ साठेंनी प्रबोधनाचे फार मोठे काम केले. त्यांनीच पहिल्यांदा शिवरायांचं नाव देशाबाहेर नेलं. सावित्रीबाई फुले, म.ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे इत्यादी महापुरुषांनी समाजाला जागृत करण्याचे काम केले. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात गुगलने सावित्रीबाईंचा लोगो प्रकाशित केला आणि बहुजन समाज मात्र भलत्याच देवतेचे गोडवे गात बसला. जग कुठे चाललं आणि आपण कुठे जात आहोत, याचा विचार समाज करणार की नाही, असा सवाल श्री.महाराव यांनी केला.
ज्ञानेश महाराव पुढे म्हणाले, बुवाबाजी, कर्मकांड ह्या भ्रामक गोष्टी आहेत. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करताना आणि ते वाढविताना तिथी आणि मुहूर्त कधी पाहिले नाही. परंतु सुशिक्षित लोक अजूनही वास्तुशास्त्राचा आधार घेतात. घरात दिशा शोधणाऱ्यांची नेहमीच ‘दुर्दशा’ झाली, असे स्पष्ट करुन श्री.महाराव यांनी भावनेच्या आहारी जाण्यापेक्षा बुद्धीने विचार करावा, असे आवाहन केले.
ज्ञानेश महाराव यांनी आपल्या भाषणात संत बहिणाबाई, तुकाराम, कबिर, एकनाथ, ज्ञानेश्वर, तुकडोजी महाराज यांच्या ओव्या, अभंग उद्धृत करुन भटशाही हा सामाजिक आणि राजकीय रोग असल्याचे ठासून सांगितले. नरेंद्र दाभोळकरांच्या अंत्ययात्रेला पाच हजार लोक येतात आणि आसारामबापूंना अटक होते तेव्हा दोन तास मुंबईची रेल्वे रोखून धरली जाते. ‘रडायचं कुणासाठी आणि लढायचं कुणासाठी’, हे बहुजनांना केव्हा कळणार, असा सवालही श्री.महाराव यांनी केला. यावेळी आ.विजय वडेट्टीवार यांनी अध्यक्षीय भाषण केले. ते म्हणाले,अनिष्ट रुढी, परंपरा आणि कर्मकांड सोडल्याशिवाय बहुजन समाजाची प्रगती शक्य नाही. जाती, धर्माच्या नावावर समाजात फूट पाडणाऱ्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन आ.वडेट्टीवार यांनी केले. स्पष्ट विचार मांडणाऱ्यांना येथे देशद्रोही ठरविले जाते, असा आरोप त्यांनी यावेळी केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, प्रास्ताविक अनिल मुनघाटे, तर आभारप्रदर्शन स्मिता लडके यांनी केले.
कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कल्याणकर, प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, प्रा.डॉ.अमीर धमानी, प्रा.डॉ.कृष्णा राऊत, प्रा.डॉ.दुबे, प्राचार्य साकुरे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.