पोलिस ठाण्यात माझा मानसिक छळ-पिडीत दिव्यांग महिलेचा आरोप

0
16

गोंदिया,दि.22-सिंधी शिक्षण संस्थेतील स्वामी टेऊराम आदर्श इंग्लिश शाळेतील लिपीक पदाचा राजिनामा २0१५ मध्ये दिला. शाळा व्यवस्थापनामध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. या वादात एक गट दुसर्‍याचा काटा काढण्याकरिता आपल्याला समोर करत आहे. पैशांशी संबंधीत व्यवहाराला मुख्याध्यापक आणि इतर मंडळी जबाबदार असताना देखील त्याकरिता मला वेठीस धरण्यात आले. २0१0 ते २0१५ या काळात ४६ लाखांचा अपहार केल्याची पोलिस तक्रार माझ्याविरोधात करण्यात आली. मात्र, या प्रकरणाची चौकशी मी नोकरीत लागल्यापासून म्हणजे २000 ते २0१५ या काळातील करण्यात यावी. याप्रकरणी मी शहर पोलिस ठाण्यात गेल्यावर माझा दररोज मानसिक बलात्कार होतो, असा आरोप पीडित महिला अनिता बिसेन यांनी केला.
या प्रकरणातील तपासी अधिकारी बोरकर यांची भूमिका संदेहास्पद आहे, त्यामुळे या प्रकरणात महिला तपासी अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी देखील अनिता बिसेन यांनी केली.
अनिता बिसेन आज शनिवारी पत्रकारांशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, माझे (३२ ) वर्ष असून मी २000 मध्ये सिंधी संस्थेच्या स्वामी टेऊराम आदर्श इंग्रजी शाळेत लिपीक पदावर कार्यरत होती. मात्र, मी अपंग असून माझे लग्न जमल्यामुळे मी रितसर पत्रव्यवहार करून २0१५ पासून शाळा सोडली. त्यानंतर मी गुजरात राज्यातील वडोदा येथे स्थायिक झाली. यादरम्यान २0१६ मध्ये राकेश होतचंदानी यांनी माझ्या विरोधात ४६ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्रकार नोंदविली.
ही बातमी माझ्या मित्रांकडून कळल्यामुळे मी सहा महिन्यांच्या मुलीला घेवून गोंदिया गाठले. पोलिस ठाण्यात जावून आपली बाजू मांडली. न्यायालयाच्या आदेशामुळे मी दर सोमवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावते. मी दोन्ही पायांनी दिव्यांग असून देखील पोलिस मला चार ते पाच तास आरोपींसोबत बसवून ठेवतात. त्याठिकाणीच मी माझ्या मुलीला दूध पाजते. येथे येणार्‍यांच्या नजरा माझ्याकडेच असतात. त्यामुळे माझा पोलिस ठाण्यातच मानसिक बलात्कार होत आहे. मी जर संस्थेत एका रुपयांचाही घोटाळा केला असल्यास मला शिक्षा मान्य आहे. परंतु, या प्रकरणाची चौकशी २000ते २0१५ या काळातील संपूर्ण व्यवहाराची व्हावी. त्यात जे जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई व्हावी. यासंस्थेतील संचालक आणि सदस्यांत आपसी भांडण आहे. तीन महिन्यानंतर संचालक मंडळाची निवडणूक आहे. त्याकरिता मला गोवण्यात येत आहे. या अत्याचारामुळे मी व्यथित झाली आहे.
या पगकरणाचा तपास करणारे शहर पोलिस ठाण्यातील तपासी अधिकारी बोरकर यांची भूमिका देखील संशयास्पद आहे. ते खोटे बयाण नोंदविण्याकरिता माझ्यावर दबाव आणत आहेत. मी महिला असल्यामुळे माझ्यासोबत महिला शिपाई असणे गरजेचे असताना देखील शहर पोलिसांनी माझ्यासोबत महिला शिपाई दिले नाही. प्रकरणाचा नि:ष्पक्ष तपास करण्याकरिता बोरकर यांच्याऐवजी महिला तपासी अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी अनिता बिसेन यांनी केली.यावेळी मानवाधिकार आयोगाच्या राज्य सचिव धर्मिष्टा सेंगर, अध्यक्ष आशा नागपुरे, आदेश शर्मा, सुनील डोंगरवार, डॉ. सोनवाने, महिलेचे पती विजय मिस्त्री उपस्थित होते.

..तर, आंदोलनाची भूमिका
हे प्रकरण आपल्याकडे आले. त्यानंतर शहानिशा केल्यानंतर अनिता बिसेन यांची बाजू समजली. या प्रकरणात पोलिस आणि संस्था अनिता बिसेन यांच्याविरोधात षड्यंत्र रचत असल्याचे समजते. पोलिसांनी आपली भूमिका नमती न घेतल्यास येत्या आठ दिवसानंतर जिल्ह्यातील सर्व महिलांच्या संघटना आणि इतर समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, अशी माहिती धर्मिष्टा सेंगर यांनी दिली.