स्वजिल्हा बदलीसाठी आत्मदहनाचा इशारा

0
16

गोंदिया,दि.22-सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील १९ कंत्राटी कर्मचार्‍यांचा स्वजिल्ह्यात बदलीचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षणमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक लावण्यात यावी, अन्यथा २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा अन्यायग्रस्त कर्मचारी धनजंय चव्हाण यांनी दिला आहे.
चव्हाण यांनी निवेदनात म्हटले की, २00६-0७ मध्ये जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली. कंत्राटी कर्मचार्‍यांची बदली इतर जिल्ह्यात करण्यात येऊ नये, असे शासनाचे धोरण आहे. असे असतांना चार वर्षापूर्वी जिल्ह्यातील १९ कंत्राटी कर्मचार्‍यांची ८00 किलोमीटर दूरवरील नांदेड जिल्ह्यात बदली करण्यात आली.
दरम्यानच्या काळात कर्मचार्‍यांनी स्वजिल्ह्यात बदली व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांपासून ते लोकप्रतिनिधी व संबंधितांकडे पाठपुरावा केला. गेल्या वर्षी १ मे २0१६ रोजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांची कर्मचार्‍यांनी सहकुटूंब भेट घेऊन आपली व्यथा मांडली व न्याय देण्याची मागणी केली होती. परंतु, कर्मचार्‍यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही.
कर्मचार्‍यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक लावण्यात यावी, यासाठी २३ जानेवारीपासून गोंदिया जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलनास सुरूवात होईल व २६ जानेवारीपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास आपल्याला आत्मदहनाचा मार्ग स्विकारावा लागणार असल्याचे धनजय चव्हाण यांनी म्हटले आहे.