युवा मतदार बळकट लोकशाहीचा आधार

0
18

भंडारा,दि.26: लोकशाही प्रणालीत मतदान प्रक्रियेला अनन्य साधारण महत्व असून युवा व भावी मतदार हे बळकट लोकशाहीचा आधार आहेत. वयाची १८ वर्ष पूर्ण करणारे तरुण व तरुणी भावी मतदार असून या भावी मतदारांनी निवडणूक आयोगाचे सदिच्छा दुत कार्य करुन आपल्या परिसरातील नवमतदारांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.७ वा राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम सामाजिक न्याय भवन येथे साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय उरकुडे, उपजिल्हाधिकारी विजया बनकर, तहसिलदार संजय पवार उपस्थित होते.
या कार्यक्रमात जिल्हयातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक मत महत्वाचे या विषयावर पथनाटय सादर केले. तसेच याच विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या दोन्ही स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उर्त्स्फुत सहभाग लाभला. यावेळी नवमतदारांनी मतदान पत्राचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय मतदार दिनाविषयी माहिती दिली. तसेच १८ ते २१ या वयोगटातील नवमतदारांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी. १५ ते १७ या वयोगटातील उमदवारांनी आपली तयारी ठेवावी, असे सांगितले. ज्यांची नावे नव्याने नोंदवावयाची आहे, नावे मतदार यादीतून वगळायचे आहे, ज्यांना दुसऱ्या मतदार केंद्रात नाव स्थानांतर करावयाचे आहे, तसेच ज्यांच्या नावात बदल झालेला आहे, अशा मतदारांनी नमुना क्र. ६ , ७ व ८, 8-अ या नमुन्यात आपले स्वयंपूर्ण अर्ज सादर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.अनेकदा मतदारांचे नाव वगळणी न झाल्यामुळे निवडणूकी मतदानाची टक्केवारी कमी होते. म्हणून अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमास शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थींनी, नवमतदार, नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.