दोषी अधिकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करणार :खा. नाना पटोले

0
22

लाखांदूर दि.१६ : गोरगरिब जनतेला देण्यात येणार्‍या धान्यावर येथील तत्कालीन तहसीलदारांनी डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. येथील तहसीलदारांनी धान्य पुरविताना रेशन दुकानदारांवर प्रशासनाने कार्यवाही केली. मात्र अधिकारी कर्मचार्‍यांना मोकाट सोडले असा आरोप करीत या घोटाळ्यात दोषी अधिकारी कर्मचार्‍यांवरही कारवाई करणार, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.यावेळी आ. बाळा काशिवार, जि. प. सदस्य मनोहर राऊत, रमेश डोंगरे, सभापती मंगला बगमारे, नगराध्यक्ष निलम हुमणे, उपाध्यक्ष नरेश खरकाटे, तहसीलदार तोडसाम, नायब तहसीलदार मुर्वेतकर, बिडीओ देवरे, आरोग्य अधिकारी नैताम, भाजपा अध्यक्ष नूतन कांबळे, गटनेता रामचंद्र राऊत यासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
१४ फेब्रुवारी रोजी लाखांदूर तहसील कार्यालयात आयोजित जनता दरबार कार्यक्रमात ते बोलत होते. खा. पटोले पुढे म्हणाले जुलै २0१३ ते डिसेंबर २0१३ या सहा महिन्याच्या कालावधीत जवळपास सव्वा दोनशे क्विंटल धान्याचा घोटाळा झाल्याची माहिती अधिकारात उघड झाली होती. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने दखल घेत केवळ रेशन दुकानदारांवर दंडात्मक व निलंबनाची कार्यवाही केली होती. धान्य नेणार्‍यांवर कार्यवाही होतांना धान्य पुरविणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे उघड सत्य दिसून येत आहे. धान्य नेणारे रेशन दुकानदार यांना दोषी धरले जात असतांना धान्य पुरविणारे अधिकारी कर्मचारी त्याहून अधिक दोषी असल्याचा आरोपही केला.गोरगरिब जनतेचे धान्य जनतेला न देता हेतू पुरस्पर या धान्याचा अपहार करण्यास बाध्य पाडणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यावर कार्यवाही झालीच पाहिजे ही आग्रही मागणी राज्य शासनाकडे करणार असल्याचे देखील बोलले. कार्यक्रमाचे संचालन व आभार नायब तहसीलदार विजय कावळे यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील ग्रा.प.पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी व नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती.