देसाईगंज-गडचिरोली लोहमार्गासाठी चार दिवसांत पहिले जमीन हस्तांतरण

0
5

गडचिरोली,दि. १७: प्रस्तावित वडसा-गडचिरोली या नव्या महत्वाकांक्षी लोहमार्गाच्या कामास गती देण्यात आली असून, येत्या चार दिवसांत ३ गावांमधील शासकीय जमीन रेल्वेला हस्तांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिली.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी मुख्य अभियंता पांडे, उपमुख्य अभियंता नबीन पात्रा, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शैलेंद्र मेश्राम उपस्थित होते. पुढील काळात गतिमान पध्दतीने भूसंपादन व्हावे यासाठी या मार्गावर वाटाघाटीव्दारे भूसंपादन करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार रेडीरेकनरचे दर गृहीत धरुन रेल्वेकडून रक्कम प्राप्त करुन घेण्यात येत आहे. शासकीय जमीन हस्तांतरीत करण्याचे प्रस्ताव ३ गावांनी संमत केले असून ते २० तारखेपर्यंत रेल्वेच्या नावे नोंदणी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
खासगी भूसंपादनांतर्गत जो शेतकरी दर मान्य करुन आपली जमीन देण्यास तयार होईल, त्याला तत्काळ धनादेश देऊन आगामी काळात भूसंपादन पूर्ण करण्याची तयारी करण्यात आली आहे, असे नायक यावेळी म्हणाले.
वडसा–गडचिरोली लोहमार्गासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासन आग्रही असून या कामासाठी नुकतीच वडसा येथेही एक बैठक घेण्यात आली होती. हे काम निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी साप्ताहिक बैठका घेऊन या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे.