वन विभागाच्या ‘चांदा ते बांदा’ योजनेसाठी १० कोटी १७ लाख रुपयांचा निधी

0
8

मुंबई, दि. २ : चंद्रपूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात रिसोर्स बेस्ड प्लानिंग आणि डेव्हलपमेंट हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यासाठी चांदा ते बांदा ही योजना वन विभागांतर्गत राबविण्यास नियोजन विभागाने २८ जून २०१६
रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिल्यानंतर या योजनेतील वन विभागाशी संबंधित कामे करण्यासाठी विभागाने दि. २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये १० कोटी १७ लाख रुपयांचा निधी वितरित आणि खर्च करण्यास मान्यता दिली आहे.
राज्यमंत्री वित्त व नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली या पथदर्शी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी समिती नेमण्यात आली असून वन विभागांतर्गत योजनेमध्ये विविध प्रकारची कामे केली जाणार आहेत. यामध्ये चंद्रपूर
वनवृत्तामध्ये मोहाफुले गोळा करणे, त्यावर शास्त्रोक्त पद्धतीनेप्रक्रिया करणे, मधमाशापासून बनवलेले (मध पोळ्यापासून) मध उत्तम दर्जाचे असल्याने मधमाशी संकलन पेटीची काळजी घेणे आणि सफाई करण्यासाठी वेळोवेळी मधमाशी संकलनकर्त्याला प्रशिक्षण देणे, त्या अनुषंगाने चंद्रपूर वनवृत्तामधील संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत सदर क्षेत्रात प्रशिक्षण केंद्र उभारणे व तेथील जनतेला प्रशिक्षण व मार्गदर्शन देणे यासारखे काम
केले जाणार आहे. डिसेंबर २०१६ मध्ये या योजनेकरिता १०९७ लाख निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. त्यापैकी १०१७.६० लाख निधी वितरित व खर्च करण्यास वन विभागाने मान्यता दिली आहे.