उपचारासाठी दिशा देणारे डिजीटल थर्मामीटर उपयुक्त- उषा मेंढे

0
9

सिकलसेल ग्रस्तांना थर्मामीटर वाटप
गोंदिया,दि.२ : प्रत्येक व्यक्तीने आजार झाल्यावर त्यावर वेळीच उपचार करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. सिकलसेल हा आजार अनुवांशिक आहे. सिकलसेलग्रस्तांना वाढत्या तापात वेळीच उपचार करण्याची दिशा देणारे डिजीटल थर्मामीटर अत्यंत उपयुक्त आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. १ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सिकलसेलग्रस्तांना डिजीटल थर्मामीटर वाटप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्रीमती मेंढे बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, समाज कल्याण समिती सभापती श्री.वडगाये, जि.प.सदस्य श्री.लोणारे, श्री.डोंगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, बाई गंगाबाईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांची उपस्थिती होती.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले, ताप येणे आणि अंग दुखणे ही सिकलसेलची लक्षणे आहे. अशावेळी रुग्णांनी वेळीच उपचारासाठी जावे. सिकलसेलग्रस्तांना वेळीच ताप मोजता यावा व ताप वाढल्यास उपचारासाठी डॉक्टरांकडे जावे. जिल्ह्यातील सर्व सिकलसेल ग्रस्तांसाठी आपल्या पुढाकारातून मुंबईच्या हिंदूजा फाउंडेशनने ही डिजीटल थर्मामीटर दिले आहेत. असे ते म्हणाले.
प्रास्ताविकातून डॉ.निमगडे म्हणाले, राज्यात सन २००९ पासून सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमाअंतर्गत बालके, गरोदर स्त्रिया आणि रुग्णांची काळजी घेण्यात येत आहे. सिकलसेल आजाराचा दोष गुणसुत्रात लपलेला असतो. पती व पत्नी हे सिकलसेल वाहक असतील तर त्यांच्या पाल्यांना होण्याची शक्यता जास्त असते. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केअर सेंटर असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.निमगडे यांनी डिजीटल थर्मामीटरच्या वापराबाबत व हाताळण्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमात काही सिकलसेलग्रस्तांना डिजीटल थर्मामीटरचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. अनेक सिकलसेलग्रस्त व त्यांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते. संचालन प्रबुध्द विनायती कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष शुध्दोधन शहारे यांनी केले, उपस्थितांचे आभार डॉ.जनईकर यांनी मानले.